विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 तारखेला मतदान आहे. त्याआधी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरु आहे. 11 जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं एक एक आमदारांचं मत, महत्वाचं आहे..त्यातच गुप्त मतदान होणार असल्यानं खबरदारी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष आपआपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार लोअर परळच्या ग्रँड आयटीसी हॉटेलमध्ये राहणार काँग्रेसही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. शरद पवार गटानं हॉटेल बुकिंग न करण्याचं ठरवलंय. महायुतीकडूनही भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. महाराष्ट्रातल्या आमदारांना हॉटेल पॉलिटिक्स नवीन नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठेवलं होतं. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दगाफटका नको म्हणून शरद पवार गट सोडून इतर सर्व पक्ष आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत.
दुसरीकडे मतांची जुळवाजुळव सुरु झाली असून हितेंद्र ठाकूरांकडे महायुती आणि मविआ दोघांची नजर आहे…बहुजन विकास आघाडीकडे 3 आमदार आहेत.. पण हितेंद्र ठाकूर नेमके कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय. कारण हिंतेंद्र ठाकूरांनी आधी शरद पवारांची भेट घेतली नंतर महायुतीच्याही नेत्यांना भेटले. पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठींबा दिलाय. त्यामुळं जयंत पाटलांना निवडून आणण्याची जबाबदारी शरद पवारांचीही आहे..त्यासाठीच हितेंद्र ठाकूरांच्या बविआची 3 मतं मिळवण्यासाठी शरद पवारांनी हालचाली सुरु केल्यात. मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर, हितेंद्र ठाकूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली. विधीमंडळात हितेंद्र ठाकूरां सोबत शिंदे आणि फडणवीसांची बैठक झाली. त्यामुळं हितेंद्र ठाकूरांची मतं कोणाकडे जाणार यावरुन सस्पेंस वाढलाय.
याआधी हितेंद्र ठाकूरांना विचारणा केली असता, माझ्यावर कोणीही दावे करु शकत नाही, असं हितेंद्र ठाकूर म्हणालेत. विधान परिषदेच्या ज्या 11 जागांसाठी निवडणूक होतेय..त्यासाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत. सध्या विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ 274 आहे आणि विजयाचा कोटा 23 मतांचा आहे. महायुतीनं 9 उमेदवार दिलेत. तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आहेत. महायुतीकडे भाजपचे 103 आणि अपक्ष 8 असे एकूण 111 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वत:चे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 37 आमदार आणि अपक्ष 6 असे 43 आमदार आहेत. एकूण महायुतीकडे मतं आहेत, 197…9 व्या उमेदवारासाठी आणखी 10 मतं हवीत.
पाहा व्हिडीओ:-
महाविकास आघाडीची मतं पाहिली तर. काँग्रेस 37, ठाकरेंची शिवसेना शंकरराव गडाख या एका अपक्षांसह 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादीकडे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं अशी एकूण 66 मतं होतात. मविआचे 3 उमेदवार आहेत.. तिसऱ्या उमेदवारासाठी 3 मतं हवीत.. मात्र क्रॉस व्होटिंगच्या भीतीनं काँग्रेसनं प्रत्रा सातवांना 3-4 अधिक मतं दिली तर आणखी मतं लागतील. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही छोट्या मित्रपक्षांची मदत हवीच आहे.
बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं, प्रहारचे 2, एमआयएम 2 आणि समाजवादी पार्टी 2, मनसे 1 आणि माकपचा 1 आमदार आहे. ही एकूण मतं आहेत 11. मात्र, या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीनं मतदान होणार आहे. त्यामुळं क्रॉस व्होटिंगची दाट शक्यता आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं 1 उमेदवार मागे घ्यावा, असं फडणवीस म्हणाले होते..पण आमच्याकडे विजयाची मतं असल्याचं सांगत मविआनं उमेदवार मागे घेतला नाही.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाकडून शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढतायत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांनी निवडणुकीत उडी घेतल्यानं मतांच्या फुटीची धाकधुक वाढलीय. कारण नार्वेकरांचं सर्वपक्षीय संबंध असून ते निवडून येतील, असं भाजपच्याच दरेकरांनीच म्हटलंय. त्याचवेळी विकेट मविआचीच जाईल असा दरेकरांचा दावा आहे. 2 वर्षांआधी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली होती. फेब्रुवारीतही राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटून हंडोरेंचा पराभव झाला होता. त्यामुळं या निवडणुकीत मतं फुटून नयेत म्हणून महाविकास आघाडीही अलर्ट आहे.