अकोल्यात काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकरचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला मृत्यूचं कारण हार्टअटॅक सांगण्यात आलं होतं. मात्र पोस्टमार्टेम रिपोर्टमधून मालोकारला जबर मारहाण करण्यात आल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय.
दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या विधानावर मिटकरींनी टीका केल्यामुळे अकोल्यात मनसेनं मिटकरींची गाडी फोडली. त्यावेळी मनसे समर्थक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण जय मालोकार बाजूला उभा होता. तोडफोडीच्या काही वेळेतच मालोकारचा अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र त्यावेळी मनसेनंच मालोकारला मारहाण केल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला होता. दुसरीकडे तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी फरार झाले होते. त्याच प्रकरणाला आता
नवीन वळण मिळालंय.
विदर्भ दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी मालोकार कुटुंबियाच्या सांत्वनासाठी पोहोचले. त्यावेळी राज ठाकरेंपुढे आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला, याच्या चौकशीची मागणी मालोकार यांच्या आईनं केली होती. तेव्हा राज ठाकरेंनी डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये मालोकारचा मृ्त्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगत मनसे समर्थकाच्या आईचं सांत्वन केलं होतं. पण आता प्रत्यक्षात पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे मालोकारचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं हार्ट अटॅकमुळे मृत्यूचा रिपोर्ट देणारं कोण होतं., त्यांच्यावर कुणाचा दबाव होता. हा देखील प्रश्न विचारला जातोय.
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये म्हटलंय की जय मालोकारच्या पाठीवर, छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाली. छातीच्या चार ते पाच बरगड्या फ्रॅक्चर होत्या. डोक्यालाही गंभीर इजा आणि मेंदूला सूज होती. मानेवरच्या मज्जातंतूना गंभीर दुखापतही झाली होती. त्यामुळे इतक्या जखमा असूनही डॉक्टरांनी मालोकारच्या मृत्यूचं कारण हार्टअटॅक का सांगितलं? डॉक्टरांवर कुणाचा दबाव होता का? पोलिसांनाही मान-पाठ-छाती आणि अंगावरच्या जखमा दिसल्या नाहीत का? मिटकरींच्या गाडी तोडफोडीत सहभागी न झालेल्या मालोकारला नंतर कुणी मारहाण केली. मारहाणीचं कारण काय होतं? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
पाहा व्हिडीओ:-
पाऊस आणि धरणाचं पाणी सोडल्यामुळे काही महिन्यांपूर्वी पुणे जलमय झालं. पाहणीवेळी अजित पवार नसतानाही धरणातून पाणी सोडल्याचं विधान राज ठाकरेंनी केली. त्यावर सुपारीबहाद्दरानं अजित पवारांवर बोलू नये, असं उत्तर मिटकरींनी दिलं याविरोधात मनसेनं अकोल्यात मिटकरींच्या गाडीपुढे घोषणा देत वाहनावर हल्ला केला. त्या गर्दीत मनसेचा कार्यकर्ता जय मालोकार देखील होता. याच तोडफोडीनंतर अचानक मालोकारचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका सांगण्यात आलं होतं.
पुण्याच्या पुरावरुन राज ठाकरेंनी अजित पवारांवर विधान केलं. त्याला मिटकरींनी उत्तर दिलं. त्याविरोधात मनसेचे काही पदाधिकारी मुंबईहून अकोल्यात पोहोचले. मिटकरींची गाडी फोडली. त्या राड्यानंतर मनसेचाच एक समर्थक आणि होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या जय मालोकारचा मृ्त्यू झाला. आता पोस्ट मार्टेम रिपोर्ट मालोकारच्या मृत्यू नव्हे तर हत्येकडे बोट दाखवतोय. तोडफोडीनंतरच्या ३ तासात मालोकारसोबत काय झालं. त्याला कुणी मारहाण केली. याचा उलगडा व्हावा, अशी माफक अपेक्षा मालोकारच्या कुटुंबियांनी केलीय.