सरकारी योजना लाडक्या बहिणीला सातारच्या एका बहाद्दरानं चुना लावलाय. या गैरप्रकारामुळे प्रशासन खरोखर गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवतंय की नाही, यावरही बोट ठेवलं जातंय. घरी बसल्या-बसल्या खोटी कागदपत्रं देवून सातारच्या महाभागानं लाडक्या बहिण योजनेतून ७८ हजार रुपये लाटले. धक्कादायक म्हणजे एका महिलेच्या तक्रारीनंतर प्रशासन खळबळून जागं झालं.
बायको एकच…..मात्र तिच्या नवरोबानं तिचे वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळी हेअरस्टाईल, मेकअप करुन २६ पासपोर्ट फोटो काढून घेतले. याच २६ पासपोर्टफोटोंसोबत विविध २६ महिलांचे आधार कार्ड जोडून अर्ज करण्यात आला. त्या महिलांच्या आधार कार्डसोबत स्वतः मोबाईल नंबरही जोडून घेतला. धक्कादायक म्हणजे हे सव्वीसच्या सव्वीस अर्ज मंजूरही झाले आणि जिथं फक्त पंधराशेच्या हिशेबानं २ महिन्यांचे ३ हजार जाणं अपेक्षित होतं, तिथं ३ हजारांऐवजी ७८ हजार रुपये गेले.
म्हणजे विधानसभेनंतर कुणाचंही सरकार येवो. मात्र या पठ्ठ्यानं एकाच महिन्यात गैरप्रकार करुन 2025, 2026, 2027 आणि 2028. या चार वर्षाचे पैसे एकाच दमात पदरात पाडून घेतले. हा प्रकार समोर कसा आला याचीही एक रंजक कहाणी आहे.. गैरव्यवहार झाला साताऱ्यात आणि भांडाफोड झाला नवी मुंबईत. या महिलेचं नाव आहे पूजा प्रसाद महामुनी. राहणाऱ्या नवी मुंबईतल्या यांनी सुद्धा लाडक्या बहिणीसाठी अर्ज केला होता. पण तुमचा अर्ज आधीच मंजूर झाल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी तो रद्द केला. पूजा महामुनींनी याची विचारणा केल्यावर त्यांचा आधार नंबर हा साताऱ्यातल्या जाधव नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलशी जोडलेला असल्याचं समोर आलं., तिथूनच या प्रकाराचा उलगडा झाला.
पाहा व्हिडीओ:-
काही दिवसांपूर्वी असाच प्रकार यवतमाळमध्ये घडला होता.जाफर शेख नावाच्या एका पुरुषाच्या खात्यावर अर्ज न करताही लाडकी बहिण योजनेचे ३ हजार पडले. आता या नव्या प्रकरणात संबंधित व्यक्तीनं किती बँक खाती वापरले होते., इतक्या महिलांचे आधार नंबर कसे काय मोबाईलशी कनेक्ट केले. हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि स्थानिक अधिकारी अद्याप बोलायला तयार नाहीत.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खरोखरच अर्ज खरे आहेत की खोटे याची पडताळणी होत नाहीय का अशीही शंका वर्तवली जातेय. काही दिवसांपूर्वी भाजपच्या महेश शिंदेंनी केलेलं विधान वादात आलं होतं. महिलांनी महायुतीला मतदान न केल्यास निवडणुकीनंतर डिसेंबरमध्ये अर्जांची पडताळणी करुन नावं काढून टाकू अशी धमकी त्यांनी दिली होती. स्वतः अजित पवार देखील लाडक्या बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची पार्श्वभूमी ऐकून आश्चर्य व्यक्त करतायत.