भाजप नेते नितेश राणेंवरुन महायुतीत अजित पवार विरुद्ध नितेश राणे अशी शाब्दिक चकमक सुरु होती. आता त्यात किरीट सोमय्यांनीही उडी घेत मुस्लिम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, असं ठणकावलंय. म्हणजेच महायुतीत दादांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना सुरु झालाय.
भाजपच्या नितेश राणेंवरुन स्वत: अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीनं उघडपणे मोर्चा उघडलाय. आम्ही धर्मनिरुपेक्ष आहोत. विशिष्ट समाजाला बोलाल तर चालणार नाही, असा दमच अजित पवारांनी दिला. तर सुनिल तटकरेंनीही बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचाही विरोधी करणारी राष्ट्रवादी असल्याचं म्हटलंय.
पाहा व्हिडीओ:-
हिंदू जनआक्रोश मोर्चातून नितेश राणे उघडपणे मुस्लिम उल्लेख करुन भडकाऊ भाषण करतायत. मात्र महायुतीतून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला हे चालणार नाही असं म्हटलंय. अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांकडेही तक्रार केली. अजित पवार आणि सुनिल तटकरे आम्ही सेक्युलर असल्याचं सांगून आपल्याच मित्रपक्षाच्या नितेश राणेंना इशारा देत आहेत..तर, भाजपच्या किरीट सोमय्यांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधला. महायुतीत राहून मुस्लिम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, असं म्हटलंय.
भाजपसोबत सत्तेत असलो तरी विचारधारा सोडलेली नाही असं अजित पवार सांगतायत. त्यामुळं नितेश राणेंवरुन सार्वजनिक भाषणातून खटके उडताना दिसतायत. मात्र सोमय्यांनीही मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, असं बजावून भाजपकडूनही इरादे स्पष्ट केलेत.