राज्यात मराठा-ओबीसी समाजामधील वातावरण तापलेलं असल्याचं पाहायला मिळालं आहे. येत्या काळाता विधानसभा निवडणुका असल्याने राजकीय नेते याचा आपापल्या परीने फायदा घेणार अशी लोकांमध्ये जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे हे मविआ पुरस्कृत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलाय. तर दुसरीकडे भुजबळांच्या शांततेच्या आवाहनामागे पुन्हा दंगलींचा डाव आहे का?अशी शंका जरांगेंनी वर्तवलीय.
स्वतः तलवारीची भाषा करणारे आता शांततेचं आवाहन करुन नवा कट रचतायत का, असा आरोप भुजबळांवर मनोज जरांगेंनी केलाय. काल पवारांची भेट घेत भुजबळांनी राज्यात शांततेसाठी पुढाकाराचं आवाहन केलं. मात्र जरांगेंनी भुजबळांच्या हेतूवर शंका घेत त्यांना लक्ष्य केलंय.
पाहा व्हिडीओ-
दुसरीकडे जरांगेंना महाविकास आघाडीचंच पाठबळ असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय. विशेष म्हणजे याआधी ओबीसी एल्गार सभांमधून भुजबळ जरांगेंवरुन त्यांच्याच सरकारला लक्ष्य करत होते. नंतर आंदोलक नवनाथ वाघमारेंनी जरांगेंना मुख्यमंत्री शिंदेंची रसद असल्याचा आरोप केला. काल वाघमारेंसोबतच उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंनी जरांगेंमागे मविआ असल्याचा दावा केलाय.
सर्वपक्षीय बैठकीआधी सरकारनं किती कुणबीपत्र दिलेत. ओबीसींना धक्का कसा लागणार नाही. याची स्पष्टता द्यावी म्हणून ओबीसी नेत्यांनी मागणी केली. नवनाथ वाघमारेंनी दावा केला की 54 लाख बोगस प्रमाणपत्र दिली गेलीत. तेव्हा सरकारनं दिलेले 54 लाख दाखले हे याआधीच्याच नोंदीनुसार दिले आहेत. मात्र माहितीनुसार नव्यानं दिलेले दाखले हे ४८ हजारच असल्याचं खुद्द गोपीचंद पडळकरांनीच सांगितलं होतं. त्यामुळे सरकारच्या आकडेवारी सत्तेतल्याच नेत्यांचा विश्वास आहे की नाही, असाही प्रश्न विचारला जातोय. दरम्यान स्वतः मंत्रीपदी असलेल्या भुजबळांनी सरकारऐवजी शरद पवारांना आवाहन का केलं. यावरुन कालपासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.