Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | महायुतीचे 2 फॉर्म्युले तयार,शिंदे, दादांना किती जागा?, पाहा Video

| Updated on: Mar 06, 2024 | 11:06 PM

भाजपची लोकसभेची दुसरी यादी उद्या येऊ शकते.ज्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचीही नावं येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठकही झाली. ज्यातून 2 फॉर्म्युले समोर आल्याची माहिती आहे. पाहुयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | महायुतीचे 2 फॉर्म्युले तयार,शिंदे, दादांना किती जागा?, पाहा Video
Follow us on

मुंबई : महायुतीच्या जागा वाटपावर मुंबईत अमित शाहांच्या उपस्थितीत खलबतं झाली. 48 जागांच्या वाटपावर शाहांची, मुख्यमंत्री शिंदे. फडणवीस आणि अजित पवारांसोबत 3 राऊंडची बैठक झाली आणि आता अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत होईल. त्या बैठकीसाठी फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत आलेत. अमित शाहांच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी रात्री साडे 10 वाजता शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली.

पाहा व्हिडीओ:-

त्यानंतर सकाळी साडे 10 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. तिसऱ्या टप्प्यातली चर्चा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाली. जवळपास अर्धा तास तिन्ही पक्षांचे नेत्यांमध्ये मंथन झालं. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 फॉर्म्युल्याची माहिती TV9च्या हाती लागलीय.

पहिला फॉर्म्युला आहे, भाजप 37 जागा लढणार शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळतील. म्हणजेच 22 जागांची मागणी शिंदेंची शिवसेना करत असली तरी विद्यमान खासदारांऐवढ्याही जागा शिंदेंना मिळणार नाही. दुसरा फॉर्म्युला आहे. भाजप 36 जागा लढणार शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा आणि अजित पवार गटाला 4 जागा मिळणार म्हणजेच जागा वाटपात दबदबा भाजपचाच राहिल

हिंगोली (भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत) उत्तर पश्चिम मुंबई (इथंही भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत) कोल्हापूर (भाजप धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे) पालघर (राजेंद्र गावित भाजपकडून लढण्याची शक्यता आहे ) आणि वाशिम-यवतमाळ (भाजप शिंदेंच्या विद्यमान खासदार भावना गवळींऐवजी स्वत:चा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे )) भाजपच्या फॉर्म्युला वन नुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या 3 जागा मिळू शकतात. त्यात बारामती, रायगड आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात बारामतीतून अजित पवारांच्याच पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जातेय.

जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील तेवढ्याच जागांची मागणी अजित पवार गटाकडून अमित शाहांसमोर करण्यात आली. ज्यात प्रामुख्यानं 9 जागांचा प्रस्तावही शाहांसमोर ठेवण्यात आल्याचं कळतंय. ज्यात बारामती, माढा, सातारा, रायगड, शिरुर, परभणी, बुलडाणा, धाराशीव, गडचिरोली-चिमुर या जागांचा समावेश आहे. तर भाजपसोबत जाताना सत्तास्थापनवेळी जे कमिटमेंट करण्यात आलं. ते कमिटमेंट पाळलं जाईल असं म्हणत मंत्री भुजबळांनी वायद्याची आठवण करुन दिलीय.

भाजपनं जागा वाटपाचं सूत्र ठरवलेलं आहे. निवडून येऊ शकेल तीच जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोडायची. त्यासाठी भाजपनं 3-3 अंतर्गत सर्व्हे केलेत. त्याच आधारेच जागांचं वाटप होईल. अजित पवारांना 3 किंवा 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसं त्यांनी बंडानंतरच्या पहिल्याच मेळाव्यात जाहीरही केलं होतं. इकडे मुंबईच्या बाबतीतही अमित शाहांनी बारकाईनं लक्ष ठेवलंय…मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांकडून मुंबईतल्या 6 जागांचाही आढावा अमित शाहांनी घेतला.

महायुती मुंबईत 6 पैकी किती जागा जिंकू शकते ? पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टींच्या जागा दुसरा उमेदवार दिल्यास परिस्थिती कशी असेल ? ही माहिती अमित शाहांनी घेतली. विशेष म्हणजेच भाजपनं मुंबईत भाजप 5 आणि शिंदे गटाला 1 जागेचा प्रस्ताव ठेवला पण शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नाही. तर भाजपनं एकनाथ शिंदेंना काखेत दाबू नये असं म्हणत सन्मानपूर्वक जागा शिंदे गटाला मिळाव्यात असं बच्चू कडू म्हणालेत.भाजपनं 195 जागांची पहिली यादी जाहीर केलेली आहे..आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसऱ्या बैठकीनंतर दुसरी यादीही जाहीर होईल. म्हणजेच पुढच्या काही तासांत महाराष्ट्रातला फॉर्म्युला समोर येईल.