महाराष्ट्रात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु झालीय. पावसाळ्यात ही भरती होत असल्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी मैदानात पाणी साचल्यामुळे मैदानी चाचणी रखडल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होताय. अमरावतीत देखील पावसामुळे विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी रखडल्यानं विद्यार्थ्यांनी थेट मैदानाबाहेर आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.
अमरावतीत पावसामुळे मैदानी चाचणी रखडली, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू केलं आहे. राज्यात 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रियाला सुरुवात झाली आहे. राज्यातील पोलीस भरती एकूण 17 हजार 471 जागांसाठी असून 17 लाख 76 हजार 256 अर्ज करण्यात आले आहेत.
बँड्समनपदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदासाठी भरती, चालक पदासाठी 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा निघाल्या आहेत. शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी भरती प्रक्रिया आहे. भरती प्रक्रियासाठी राज्यभरातून विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी आपल्या सेंटरवर दाखल झालेत. मात्र अनेक ठिकाणी पावसानं लावलेल्या हजेरीनंतर मैदानी चाचणी रद्द करण्यात आल्यायत. नांदेडमध्ये आज होणारी मैदानी चाचणी रदद् केल्यामुळे विद्यार्थ्यांना परत बोलवण्यात येणार आहे.
पावसाळ्यात पोलीस भरतीचं आयोजन केल्यामुळे विरोधकांनीही प्रशासनाला धारेवर धरलंय. मैदानी चाचणी होत नाही ही प्रशासनाची नामुष्की आहे. पावसाळ्यात भरती विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. दरम्यान पावसामुळे पोलीस भरतीला व्यत्यय येतोय. जिथे पाऊस आहे, तिकडे मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. पावसामुळे मैदानी चाचणी देणं शक्य नसल्याचं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटलंय. त्यामुळे प्रशासनानं भरतीचं आयोजन पावसाळ्यानंतर करावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येतेय.