मुंबई : राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीकरांनी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यानं एक हवंहवंसं चित्र पाहिलं. राम मंदिर सोहळ्यानिमित्त परळीत श्रीराम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात परळीकरांसोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्रितपणे सहभागी झाले. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या रुपात अवतलेली बच्चेकंपनी, पारंपरिक पेहराव करुन सहभागी झालेला महिलावर्ग, ढोल-ताशाच्या गजरात लेझीम खेळण्यात दंग झालेले नागरिक आणि परळीकरांनी केलेला जय श्रीरामाचा गजर यामुळे परळीतील वातावरणात राममय झालं होतं. अशात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळाही दिला.
महत्वाची बाब म्हणजे शोभायात्रा पार पडल्यानंतर धनंजय मुंडे तब्बल 13 वर्षानंतर पंकजा मुंडे यांच्या यशश्री या निवासस्थानी पोहोचले. भावा-बहिणीने एकत्र जेवणही केलं. परळीतील विषयांसह राज्यातील राजकीय विषयांवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहितीय. एक तपानंतर मुंडे बंधू-भगिनीला अशाप्रकारे एकत्र पाहिल्यानंतर कार्यकर्तांमधील आनंद लपून राहिला नाही.
गोपीनाथ मुंडेंची साथ सोडत धनंजय मुंडेंनी 2012 मध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. तेव्हापासून मुंडे भावा-बहिणीत कटुता निर्माण झाली. पण गेल्या काही दिवसांपासून ही कटूता कमी होताना दिसतेय.
5 डिसेंबर 2023 ला ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन दोघांनी केलेली वक्तव्ये त्यासाठी महत्वाची आहेत. आपल्यातील संघर्ष संपल्याचे संकेत धनंजय आणि पंकजा मुंडे गेल्या काही दिवसापासून देत आहेत. मात्र, बहिण भावातील नव्यानं निर्माण झालेलं हे प्रेम ठराविक राजकारणापुरतं मर्यादित न राहता, ते कायम टिकावं, अशी भावना सर्वसामान्य परळीकरांची आहे.