Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधान परिषद निवडणुकीला मिलिंद नार्वेकरांमुळे कोणाची विकेट जाणार? पाहा Video

| Updated on: Jul 05, 2024 | 3:27 PM

भाजपच्या प्रवीण दरेकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांबद्दल मोठं वक्तव्य केलंय. दरेकरांचं म्हणणंय की मिलिंद नार्वेकर जिंकतील. त्यामुळे महाविकास आघाडीतील 2 पैकी एकाची विकेट जाईल.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधान परिषद निवडणुकीला मिलिंद नार्वेकरांमुळे कोणाची विकेट जाणार? पाहा Video
Follow us on

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेसाठी तिकीट दिलंय. पण मतांचं समीकरण आणि गुप्त मतदान पद्धतीमुळं क्रॉस व्होटिंगची शक्यता नाकारता येत नाही. 2 वर्षांआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांच्या पक्षाची 9 मतं फुटली होती. आता दरेकरांना वाटतंय, की महाविकास आघाडीतील एक विकेट जाईल. विधान सभेतील आमदारांच्या मतांवर विधान परिषदेचे उमेदवार निवडून जातील.

विजयासाठी मतांचा कोटा हा 23 मतांचा आहे. काँग्रेसकडे 37 आमदार आहेत. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव सहज निवडून जातील. ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वत:चे 15 आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण 16 आमदार आहेत. मिलिंद नार्वेकरांना विजयासाठी 7 मतांची गरज आहे. सातवांना विजयी मतांचा कोटा दिल्यानंतर काँग्रेसकडील शिल्लक मतांमधून नार्वेकर आरामात निवडून येवू शकतात. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठींबा दिला. पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आमदार आहेत. म्हणजेच जयंत पाटलांना विजयासाठी 13 मतं हवीत.

दरेकरांच्या दाव्यानुसार मिलिंद नार्वेकर 7 मतांची जुळवाजुळव करतील. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव तर सहज विजयी होत आहेत. म्हणजेच शेकापचे जयंत पाटील यांची जागा धोक्यात आहे. मात्र जयंत पाटलांनीही आपल्या विजयाचा दावा केलाय. तर जयंत पाटलांच्या विजयाचा दावा, विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनीही केलाय. परबांच्या याच वक्तव्यावर दरेकरांनी मिलिंद नार्वेकरांची खात्री नाही का ? असा खोचक टोला लगावला.

पाहा व्हिडीओ:-

महाविकास आघाडीत 65 मतं आहेत. त्याशिवाय समाजवादी पार्टीचे 2 आमदार असे पकडून 67 आमदार होतात. 23 मतांच्या कोट्यानुसार तिघांनाही निवडून आणायंच असेल तर आणखी 2 मतांची गरज आहे. मविआच्या मतांकडे नजरा महायुतीच्याही असतील. कारण भाजपला त्यांचा 5 वा उमेदवार जिंकून आणण्यासाठी 4 मतं, शिंदेंना दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी 3 मतं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही दुसऱ्या उमेदवारासाठी 3 मतं हवीत. म्हणजेच महायुतीला एकूण 10 मतांची गरज आहे. म्हणजेच मतांची इकडून तिकडून जुळवाजुळव होणारच. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर रिंगणात असल्यानं या निवडणुकीत आणखी ट्विस्ट आलाय. नार्वेकरांवरुन आणखी चकीत करणारं वक्तव्य शिंदेंचे मंत्री सत्तारांनी केलंय. रामबाण औषध मुख्यमंत्र्यांकडेच असल्याचं सत्तार म्हणालेत..मिलिंद नार्वेकरांचे सर्वपक्षीय चांगले संबंध आहेत..मग स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की शिंदे गटातले आमदार. या दृश्यांवरुनही मिलिंद नार्वेकरांचे भाजपसोबतचेही संबंध लक्षात येवू शकतात.

गुप्त मतदान पद्धतीमुळं कोण कोणाला मतदान करेल काहीच सांगता येत नाही.अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार परततील असे दावे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केले जात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे असे 2 उमेदवार दिलेत. .दादांकडे 40 आणि इतर 3 असे एकूण 43 आमदार आहेत…दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मतांची आवश्यकता आहे. मात्र जर क्रॉस व्होटिंग झाली तर गर्जेंची जागा धोक्यात येईल. 11 जागा आणि 12 उमेदवार असल्यानं रस्सीखेच सुरु आहे…त्यामुळं फैसला 12 तारखेलाच होईल.