पुण्यात दारु पिवून भरधाव वेगानं अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढं काय होणार. सज्ञान समजून अर्थात प्रौढ मानून त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल का ? याचा फैसला बाल हक्क न्यायालय देणार आहे..त्यासंदर्भात सुनावणी झाली. तर वेदांतच्या वडील विशाल अग्रवालला जिल्हा सत्र न्यायालयानं 24 तारखेपर्यंत 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
दुसरीकडे राजकारणही तापलंय. शरद पवार गटाचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितलाय. देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील.आज गरीबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करुन दिला. तो पण रविवारी देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?
आरोपी वेदांतचे वडील, विशाल अग्रवालला जेव्हा कोर्टात दाखल करण्यासाठी आणलं. तेव्हा वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या गाडीवरच वंदे मातरमच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. विशेष म्हणजे दारुच्या नशेत भेदरकारपणे कार चालवून, दोघांचे जीव घेणारी घटना पुण्यात घडली. ऐरवी पुण्यातल्या कोणत्याही घटनेवरुन मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आक्रमकतेनं प्रतिक्रिया देणारे पुणे जिल्ह्यातले लोक प्रतिनिधी शांत आहेत. काँग्रेसचे आमदार धंगेकर फक्त आक्रमक आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या राहुल गांधींनी व्हिडीओ पोस्टवर संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली. पण इकडे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी फक्त ट्विट केलं. पुण्याच्या अपघाताची न्यायालयीन चौकशीची मागणी केली.
फक्त मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर काही प्रतिक्रिया दिलेली नाही पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी ऑफ दे रेकॉर्ड पत्रकारांकडे कोट दिला. माझ्या मुलानं कृत्यं केलं असतं तरी कारवाईचे आदेशच दिले असते असं अजित दादा म्हणाले. पण ऐरवी अर्धा तासापर्यंत कॅमेऱ्यासमोर बोलणारे अजित पवार मीडियासमोर आले नाहीत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत केलं. आणि फोन करुन दबाव टाकणारे कोण याचा तपास करण्याची मागणी केली. पण कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया आलेली नाही. ट्विटरवर कायम अॅक्टिव्ह असणारे आमदार रोहित पवारांचं साधं ट्विटही आलं नाही.
पैशाची मस्ती आणि पैशांचा माज, बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्याची बिघडलेली औलाद वेदांत अग्रवालला कसा आहे हे तर स्पष्टच दिसतेय. मुलगा अल्पवयीन आहे हे माहिती असतानाही बाप, विशाल अग्रवालनं मित्रांसह दारु पिण्यासाठी मुलाला पबमध्ये जावू दिलं. इतकंच नाही तर अडीच कोटींची आणि अडीचेच्या स्पीड धावणाऱ्या पोर्शे कारचं स्टेअरिंग मुलाच्या हाती दिलं. वडील विशाल अग्रवाल मुलावरुन किती सिरियस आहे हे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंच्या ट्विटवरुन सहज लक्षात येतं.
सोनाली तनपुरेंनी म्हटलंय की, कल्याणी नगर इथल्या कार अॅक्सिडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून आम्हाला आमच्या मुलाची शाळा बदलावी लागली. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा. पैशांचा माज बाजूला ठेवून मुलाला चांगले संस्कार दिले. तर मुलालाच्या कृत्यामुळं बापाला पोलीस कोठडीही झाली नसती आणि अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा आपल्यात असत्या.