पुण्यातल्या पुरावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 10 वर्ष जुन्या एका वादग्रस्त विधानाचा वाद छेडला. त्यावरुन बोचरी टीका होताच राष्ट्रवादीनंही राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर म्हणत उत्तर दिलं.
पुण्यात अजित पवार नसताना धरणातून पाणी सुटलं, अशा शब्दात राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलंय. पुण्यातल्या पूरस्थितीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी केलेल्या या विधानावर राष्ट्रवादीनं सुपारीबहाद्दरांनी काय बोलावं म्हणून राज ठाकरेंना उत्तर दिलंय.
आधीच पुण्यात पाऊस सुरु असताना पहाटे खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं पुण्यातली परिस्थिती बिकट बनली. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं गेल्यानं लोक गाफिल होती. अनेकांची घरं-वाहनं-दुकानं व्यवसायांचं मोठं नुकसान झालं. त्यात आता विमा कंपन्या नैसर्गिक संकट मानून मोबदला देण्यास तयार नाहीत. अशावेळी सरकारनं मदत करायला हवी असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
पाहा व्हिडीओ:-
पूरस्थितीवेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार विविध भागांची पाहणी करत होते. पूर ओसरल्यानंतर शिंदेंच्या ठाणे आणि पनवेलमधले पालिका कर्मचारी पुण्यात साफसफाईसाठी पाठवले गेले. त्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर टिकास्र सोडलंय. दरम्यान 2 महिन्यांपूर्वी मोदींसाठी केंद्रात भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्याच्या पूरस्थितीसाठी केंद्रालाही जबाबदार धरलंय. सरकारनं महापालिका निवडणुका लांबवल्यानं नगरसेवकही अस्तित्वात नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.