बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. त्या चिमुकल्या जिवांचे आई-वडील तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांना 12-12 तास बसवून ठेवण्यात आलं. त्यावरुन बदलापूरसह संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. 20 ऑगस्टला बदलापूरकरांनी तब्बल 11 तास रेल रोको करत सरकारला धारेवर धरलं. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणात आता काही धक्कादायक माहिती आता समोर येतेय. पीडितेची बाजू मांडण्यासाठी अॅड. असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टात वकीलपत्र सादर केलंय. त्यावेळी बोलताना आरोपीला वाचवण्यासाठी तो गतीमंद असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप सरोदे यांनी केलाय. इतकंच नाही तर पोलिसांची कारवाई राजकीय हेतूने पुरस्कृत असल्याचंही सरोद यांनी म्हटलंय.
दुसरीकडे या प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराबाबत अश्लाघ्य भाषेचा वापर करणाऱ्या शिंदे गटाच्या वामन म्हात्रे यांच्यावरील FIR गायब असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय. महाराष्ट्र पोलिसांच्या CCTNS या संकेतस्थळावरुन FIR गायब झालाय. त्यामुळे यामागचं गौडबंगाल काय? याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालीय.
पाहा व्हिडीओ:-
दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून संपूर्ण तपासाची माहिती घेतली. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी आता आधारवाडी तुरुंगात करण्यात आलीय. मात्र, या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता समोर येत असल्यानं पोलीस तपासावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.