मुंबई : निवडणूक लोकसभेची असली तरी, पुन्हा एकदा, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचाच मुद्दा गाजणार हे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट झालं. 2019मध्ये अमित शाहांनी मातोश्रीवर अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. त्यामुळं तुळजाभवनाची शपथ घेऊन सांगतो की शाह खोटं बोलत आहेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी धाराशीवमधून केलाय. जर शब्द दिला होता तर मग जाहीरसभेत मोदी आणि अमित शाहांसमोर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन का बोलले नाही?, असा सवाल भाजपच्या मुनगंटीवारांनी केला. मात्र शिंदेंचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाटांनीही भुवया उंचावणारं वक्तव्य करत ठाकरेंनी घेतलेली तुळजाभवानीची शपथ खरी असल्याचं सांगितलं.
अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजपनं दिला होता असं शिरसाट म्हणालेत. त्याचवेळी शरद पवारांनी पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यानं ठाकरेंनीच निकालानंतर युती मोडल्याचंही शिरसाटाचं म्हणणंय.अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द शाहांनी दिला असं उद्धव ठाकरे सांगतायत तो दिवस होता 18 फेब्रुवारी 2019. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर आले, मातोश्रीवर अमित शाह, फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. मातोश्रीवर शाह आणि उद्धव ठाकरेंची स्वतंत्रही चर्चा झाली.
एकाच गाडीतून फडणवीस अमित शाह उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मातोश्री बाहेर पडले. वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकसभेसह विधानसभेतही एकत्र लढण्याची घोषणा केली. पद तसंच जबाबदाऱ्यांमध्ये समानता असेल अशी घोषणा फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी केली होती पण 2019च्या विधानसभेच्या निकालानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन भाजप शिवसेनेत फिस्कटलं आणि ठाकरे कट्टर विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं मुख्यमंत्री झाले. मात्र ठाकरेंनी आता अमित शाहांना घेरण्यास सुरुवात केलीय.
तुळजापूरनंतर कळंबच्या सभेतही 12 तासांच्याच दुसऱ्यांदा तुळजाभवनीची शपथ घेऊन अमित शाहांवर ठाकरेंनी हल्लाबोल केला. आता पुन्हा एकदा आपलं शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण झालेलं नाही. हे सांगतानाच शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच असं उद्धव ठाकरे म्हणालेत.तु ळजाभवनीची शपथ घेऊन ठाकरे अमित शाह खोटं बोलत असल्याचं वारंवार सांगतायत. आता अमित शाह महाराष्ट्रातल्या पुढच्या सभेत काय बोलतात याकडे लक्ष असेल.