मुंबई : दोन दिवसांआधी, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळीबार करुन हत्या झाली. मात्र हा गोळीबार मॉरिसनंच केला की आणखी कोणी? अशी शंका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय. अभिषेक आणि मॉरिसला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली का ? असा सवालही ठाकरेंचा आहे. अभिषेक घोसाळकरांची हत्या आणि मॉरिसच्या आत्महत्येनंतर, उद्धव ठाकरेंनी
सवाल उपस्थित केलेत.
फेसबुक लाईव्हचा जो व्हिडीओ समोर आला त्यात मॉरिस, अभिषेक घोसाळकरांना गोळ्या झाडताना दिसत नाही. त्यामुळं अभिषेक आणि मॉरिसला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली का?, अशी शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलीय. गोळ्या मॉरिसनंच चालवल्या का? की अभिषेक, मॉरिसला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली का? पोलीस तपासातून आतापर्यंत हेच समोर आलंय, की मॉरिसनं आधी अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर, मॉरिसनं स्वत:वर गोळ्या झाडल्या. मात्र मॉरिसलाही दुसऱ्याने गोळी घातली का? असा प्रश्न ठाकरेंचा आहे.
उद्धव ठाकरेंपाठोपाठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्यानं खळबळ उडवली. घोसाळकरांच्या हत्येमागं सत्ताधारी पक्षातीलच प्रवक्ता असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत. तर गृहमंत्री फडणवीसांनी जग्गा जासूस म्हणत वडेट्टीवारांच्या दाव्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केला.
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत दोघांपर्यंत पोलिसांचा तपास येवून ठेपलाय. एक म्हणजे मॉरिसचाच बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याच मिश्राकडील पिस्तुलमधून मॉरिसनं गोळीबार केला. अमरेंद्र मिश्रा अटकेत असून 13 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. दुसरा आहे, मॉरिसचा जवळचा मित्र मेहुल पारेख. मेहुल पारेखची गोळीबाराच्या दिवशी घटनास्थळी नव्हता पण मॉरिसचा मित्र असल्यानं त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या संपूर्ण घटनेनंतर, अटकेत असलेल्या अमरेंद्र मिश्राची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. कोर्टातून पोलीस नेत असताना, आपल्यावर अन्याय झाला असून फसवण्यात आल्याचं अमरेंद्र मिश्रा ओरडून सांगत होता.
बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राच्याच पिस्तुलनं मॉरिसनं अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला. पिस्तुल रोज रात्री ऑफिसमध्ये ठेवायची याच अटीवर मॉरिसनं अमरेंद्र मिश्राला नोकरीवर ठेवल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलंय. अमरेंद्र मिश्रा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून त्यानं पिस्तुलचा परवाना मिळवला होता. मॉरिसचा बॉडीगार्ड, त्या दिवशी त्याच्यासोबत नव्हता त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं, असं असं अमरेंद्र मिश्राच्या पत्नीचं म्हणणंय पोलिसांना मिश्राची 13 तारखेपर्यंत कोठडी मिळालीय आणि एक एक अँगलचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.