वसईच्या गावराई पाडा परिसरात भर रस्त्यात रोहित यादवनं तरुणीची हत्या केली. रोहित आरतीवर लोखंडी पान्ह्यानं वार करत होता त्यावेळी लोकं गाड्या थांबवून व्हिडीओ बनवत होते. तरुणी जीवाच्या आकांतानं ओरडत होती पण लोकांनी खिशातले मोबाईल काढून रेकॉर्डिंग केलं पण मदत केली नाही. रोहित आणि आरतीमध्ये 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र इतरांनी बोलत असल्याच्या संशयातून बाचाबाची झाली. बाचाबाची झाल्यानंतर रोहितनं थेट लोखंडी पान्हा काढला आणि डोक्यावर सपासप वार करुन तरुणीची जागीच हत्या केली. तरुणीची मृत पावल्यावरही रोहितचे लोखंडी पान्हा मारतच होता, आणि व्हिडीओ पूर्ण शूट झाल्यावर लोक मोबाईलचा कॅमेरा बंद करुन निघून गेले.
कोणी आपली बहीण किंवा मुलगी समजून समोर आलं असतं तर आरती वाचली असती पण, मोबाईल कॅमेरा आणि सेल्फीच्या जमान्यात माणूसकी हरवलेल्या जनेतेच्या डोळ्यावर झापड आली होती का, काय माहिती. गृहमंत्री फडणवीसांनीही कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे.
भर रस्त्यात एक तरुणीचा लोकांच्या जमावासमोर जीव जातो, आणि कोणी वाचवण्यासाठी सुद्धा समोर येत नाही. कायदा, वायदा कलमं वगैरे काय लागायचं ते लागेल. त्या हत्या करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई होईलही. पण जे व्हिडीओ बनवत होते, त्यांचं काय?