मनोज जरांगे पाटलांची मागणी सरकारकडून पूर्ण न झाल्यामुळे जरांगे आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकींसाठी प्लॅन आखला असून महायुती आणि मविआला त्यांनी इशारा दिलाय. आगामी विधानसभेसाठी मोठा डाव टाकणार असल्याचंही जरांगे पाटलांकडून सांगण्यात आलंय.
दरम्यान जरांगे पाटील कोणता डाव टाकणार यासंदर्भातली चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. यासंदर्भात अनेकदा मुख्यमंत्र्यांनी जरांगेंकडे शिष्टमंडळ देखील पाठवल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मागील अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान या योजनांच्या वादात आता जरांगे पाटलांनी देखील उडी घेतलीय. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेतून सरकारनं डाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी जात एका तरुणीनं शिक्षणात येणाऱ्या अडचणींसंदर्भात जरांगेंकडे खंत व्यक्त केली. यावेळी या तरुणीला अश्रूही अनावर झाले होते. दरम्यान या तरुणीनं उपस्थित केलेल्या जात पडताळणीच्या मुद्द्यावरुन जरांगे पाटलांनी दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर टीकास्त्र डागलंय.
पाहा व्हिडीओ:-
मराठा आरक्षणावरुन एकीकडे जरांगेंचं उपोषण सुरुय. तर दुसरीकडे अजय बारस्कर यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. दरम्यान यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, आंदोलनाची परवानगी न घेतल्यामुळे बारस्कर यांना पोलिसांनी उचलून नेलं होतं.
सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टला डाव टाकण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. त्यामुळे सरकार जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात कधी निर्णय घेणार किंवा जरांगे पाटील 29 ऑगस्टला कोणता डाव टाकणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणारय.