बारामतीतून अजित पवार लढणार की नाही याबद्दल तेच अजून संभ्रमात आहेत का? अशी चर्चा त्यांच्या विधानानं सुरु झालीय. इतकी कामं करुनही बारामतीकरांनी लोकसभेला वेगळा निर्णय घेतल्याचं म्हणत एकदा मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळायला हवा., असं अजित पवारांनी म्हटलं. त्यानंतर समर्थकांनी गोंधळ घालत अजित पवारांनाच पुन्हा लढण्याचा आग्रह धरला.
2019 च्या विधानसभेत अजित पवार बारामतीत लाखांहून जास्त मतांनी जिंकून आले. महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी जिंकणारे म्हणून अजित पवारांच्या नावे रेकॉर्डही झाला. मात्र यंदा त्याच अजित पवारांनी बारामतीकरांपुढे स्वतःच्याच उमेदवारीबद्दल साशंकता व्यक्त करुन दबावतंत्र अवलंबलं आहे का.याची चर्चा होतेय.
पाहा व्हिडीओ:-
कारण लोकसभेला अजित पवारांसोबत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि सत्तापक्षाची ताकद असूनही बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 47 हजार 381 मतांचं लीड मिळालं. याशिवाय भोर, पुरंदर, इंदापूर, दौंड या चार ठिकाणीही सुळेंनाच आघाडी मिळाली. आणि ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार होते, त्या एकमेव खडकवासल्यात सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या. त्यामुळे स्वतःच्या हक्काच्याच मतदारसंघात अजित पवार स्वतःच्याच उमेदवारीबद्दल तयार करत असलेला सस्पेन्स चर्चेत आहे. प्रचारादरम्यान जर सुनेत्रा पवार पडल्या तर पुढे कधीच विधानसभेला उभा राहणार नसल्याचं अजित पवार म्हणाले होते., निकालानंतर कुटुंबातली फूट आणि बहिणीविरोधात पत्नीला उभं करणं लोकांना रुचलं नसल्याची कबुली अजित पवारांनी दिली.त्यानंतर आता बारामतीत दुसरा व्यक्ती आमदार व्हायला पाहिजे., असं अजित पवारांनी म्हटलंय.
दरम्यान बारामतीत गुंडगिरी चालणार नसल्याचं सांगत आरोपींना मोक्का लावला जाण्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय. त्यावर मोक्काच्या आरोपींनाच सोडणारे अजित पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधकांनी केलीय.