मुंबई : राजकारणात काय होईल सांगता येत नाही, असं निलेश लंके म्हणतायत. पण हेच निलेश लंके पुण्यात दादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्यासाठीच आले होते अशी चर्चाही होती. शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी निलेश लंकेचं तसं स्वागतही केलं. मात्र, प्रशांत जगतापांचा प्रवेश अचानक लांबला.
आमदार निलेश लंके सकाळपासून पुण्यात दाखल झाले. सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर सकाळी 10 वाजता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार लंके खासदार अमोल कोल्हेच्या भेटीला पोहोचले. लंकेनी सकाळी 11 वाजता सर्किट हाऊसमध्ये खासदार कोल्हेची भेट घेतली आणि या भेटीनंतर आमदार निलेश लंके मतदारसंघाकडे रवाना झाले.
निलेश लंकेंना त्यांच्या पक्षप्रवेशावर विचारणा केल्यावर लंकेंनी राजकारणात काय होईल सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया दिली. तर कोल्हेंनी वेट अँड वॉच म्हटलंय. निलेश लंके अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळं लंके शरद पवारांकडे येऊ शकतात अशी चर्चा संपूर्ण नगर जिल्ह्यात आहे.
2019च्या लोकसभेत भाजपचे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी लढत झाली. महायुतीत अहमदनगरची जागा भाजपकडे आहे. तर महाविकास आघाडीत नगरची जागा शरद पवार गटाकडे आहे. त्यामुळं शरद पवारांच्या गटाकडून निलेश लंके लोकसभा लढवू शकतात. अजित पवारांच्या बंडानंतर निलेश लंके अजित पवारांसोबत गेले. पुण्यात त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा असतानाच, स्वत: अजित पवार मुंबईत कोस्टल रोडच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात होते. त्याचवेळी लंकेंनी शरद पवार आणि कोल्हेंची भेटही घेतली. मात्र प्रवेश अचानक का रखडला ? यावरुन सस्पेंस आहे. स्वत: शरद पवारांनीही नेहमीप्रमाणं आपल्याला काहीही कल्पना नाही असं सांगून पत्ते उघड केलेले नाहीत.
पाहा व्हिडीओ:-
निलेश लंकेंचा पक्षप्रवेश लांबला असला तरी लंके दादांसोबत अधिक काळ राहतील असं त्यांच्या मंत्र्यांनाही वाटत नाही. त्यामुळंच एक गेला तर 5 जण येतील असं मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणालेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचाही जागा वाटपाला फॉर्म्युला आणि उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळं काही दिवसांतच लंकेंचंही चित्र स्पष्ट होईल.