मुंबई : सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला पण निकालाआधीच विरोधकांनी सरकारवर तुटून पडण्यास सुरुवात केलीय. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी तर, शिंदेंची शेवटची कॅबिनेट झाल्याचं म्हटलंय.
सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आणि इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदेंची शेवटची कॅबिनेट असल्याची टीका केलीय. शिंदे सरकारची कॅबिनेटची बैठक झाली. मात्र ही शेवटची कॅबिनेट आहे, अशी टीका अंबादास दानवेंनी केली. तर कोर्टातून वेगळा निर्णय होईल, हे लक्षात घेऊनच मंत्रालयात फाईल्स लगबग सुरु असल्याचं पटोले म्हणालेत.
कॅबिनेटच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुनही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत…शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, एका समितीचीही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली. तर सभागृहाचं कामकाज सुरु होण्याआधी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरुन विरोधकांनी आंदोलन केलं. सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली.
खोके सरकारचा उपयोग काय ?. शेतमालाला भाव नाय, अशा घोषणा विरोधकांनी दिल्यात. विधानसभेतही अजित पवारांनी अवकाळीमुळं नुकसान झालेल्या शेतीचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांचं सरकार असून वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय..त्यामुळं शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.