महाराष्ट्रातल्या 9 जागांवर मविआ विरुद्द महायुतीच्या उमेदवारांचं चित्र स्पष्ट झालंय. चंद्रपुरातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवारांमध्ये लढत होईल. सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंविरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, भंडारा-गोंदियात भाजपच्या सुनिल मेंढेंविरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोले, नागपुरात भाजपच्या नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे, पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांविरुद्ध काँग्रेसचे रविंद्र धंगेकर, गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपच्या अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान, नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी, नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांविरोधात काँग्रेसचे वसंत चव्हाण तर लातूरमध्ये भाजपच्या सुधाकर श्रृंगारेंविरोधात काँग्रेसचे शिवाजीराव काळगेंमध्ये सामना रंगणार आहेत.
चंद्रपूर लोकसभेत राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी या 6 विधानसभा येतात. गेल्यावेळी काँग्रेसचे बाळू धानोरकर विरुद्ध भाजपच्या हंसराज अहिरांमध्ये लढत झाली. काँग्रेसच्या धानोरकरांना 5,59,507 तर भाजपच्या अहिरांना 5,14,744 मतं पडली, धानोरकरांचा 44 हजार 763 मतांनी विजय झाला होता. राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा या चार विधानसभांमध्ये काँग्रेसला लीड होतं. तर वणी आणि आर्णीत भाजपचे अहिर पुढे राहिले. यंदा धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विरुद्ध मुनगंटीवारांमध्ये लढत होईल
सोलापूर लोकसभेत अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण या 6 विधानसभा येतात. 2019 ला सोलापूर लोकसभेत भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसकडून सुशिलकुमार शिंदे आणि वंचितकडून प्रकाश आंबेडकरांच्या लढत झाली होती. भाजपच्या जयसिद्धेश्वरांना 5,24,985, सुशिलकुमार शिंदेंना 3,66,377, तर वंचितच्या आंबेडकरांना 1,70,007 मतदान झालं होतं. या लढतीत जयसिद्धेश्वरांनी 1,58,608 मतांनी शिंदे-आंबेडकरांचा पराभव केला. जयसिद्धेश्वरांच्या विजयात वंचितचा घटक महत्वाचा ठरला होता. सोलापूर उत्तर-मध्य-दक्षिणसह अक्कलकोटमध्ये भाजपला लीड होतं. तर मोहोळ आणि पंढरपुरातून काँग्रेसच्या शिंदेंनी मताधिक्क्य घेतलं होतं. यंदा भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंमध्ये लढत होणार आहे.
पुणे लोकसभेत वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कँन्टोनमेंट आणि कसबा पेठ विधानसभेचा समावेश येतो. गेल्यावेळी पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसच्या मोहन जोशींमध्ये लढत झाली. बापटांना 6,32,835….तर मोहन जोशींना 3,08,207 मतं पडली. बापटांनी 3 लाख २४ हजारांहून अधिक मतांनी जोशींना पराभूत केलं. पुण्यातल्या सर्व सहा क्षेत्रांमध्ये बापट आघाडीवर राहिले होते. यंदा भाजपचे मोहोळ विरुद्द काँग्रेसच्या धंगेकरांमध्ये लढत होणार आहे.
नांदेड लोकसभेत भोकर, नायगाव, देगलूर, मुखेड, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या ६ विधानसभांचा समावेश आहे.2019 ला भाजपच्या चिखलीकरांविरुद्ध त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण लढले होते., चिखलीकर 40 हजार मतांनी जिंकले., वंचितच्या यशपाल भिंगेंनी 1 लाख 66 हजार मतं घेतली होती. भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे चव्हाणांना लीड होतं. तर नायगाव, देगलूर आणि मुखेडमध्ये भाजपचे चिखलीकर पुढे राहिले. यंदा भाजपच्या प्रताप चिखलीकरांविरोधात काँग्रेसचे वसंत चव्हाण लढणार आहेत
लातूर लोकसभेत लोहा, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा विधानसभा आहेत. गेल्यावेळी भाजपचे सुधाकर श्रृंगारे विरुद्ध काँग्रेसचे मच्छिलिंद्र कामत लढले. श्रृंगारेंना 6,61,495 तर कामतांना 3,72,384 मतं पडली होती. 2,89,111 हजार मतांनी श्रृंगारेंचा विजय झाला होता. लोहा, लातूर ग्रा. लातूर शहरासह सहाही भागात भाजपचे श्रृंगारे आघाडीवर होते. यंदा भाजपचे श्रृंगारे विरुद्ध काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंमध्ये लढत होईल.
नागपूर लोकसभेत नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या ६ विधानसभा आहेत. गेल्यावेळी भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोलेंमध्ये लढत झाली. गडकरींना 6,60,221 तर पटोलेंना 4,44,212 मतं पडली. गडकरींचा 2,16,009 मतांनी विजय झाला होता. नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम या पाच मतदारसंघात गडकरींना लीड होतं. तर नागपूर उत्तरमधून पटोले आघाडीवर राहिले.
यंदा भाजपच्या गडकरींविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे उमेदवार आहेत.
नंदुरबार लोकसभेत अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, साक्री, शिरपूर, आणि नवापूर या ६ विधानसभा आहेत. 2019 ला भाजपच्या हिना गावितांविरुद्ध काँग्रेसचे के.सी.पाडवी लढले. हिना गावितांना 6,39,136 तर पाडवींना 5,43,507 मतं पडली. 95,629 मतांनी गावितांचा विजय झाला होता. शहादा, नंदुरबार आणि शिरपूरमध्ये भाजपच्या हिना गावितांना लीड होतं. काँग्रेसचे के.सी.पाडवी अक्कलकुवा, साक्री आणि नवापुरातून आघाडीवर राहिले होते. यंदा हिना गावित विरुद्ध गोवाल पाडलींमध्ये निवडणूक होणार आहे.
भंडारा- गोंदिया लोकसभेत तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, अहेरी, तिरोडा आणि गोंदिया या ६ विधानसभा येतात.2019 ला भाजपकडून सुनिल मेंढे विरुद्ध काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांच्यात लढत झाली होती. मेंढेंना 6,50,243 तर पंचबुद्धेंना 4,52,849 मतं पडली. मेंढेंचा 1,97,394 मतांनी विजय झाला होता. विधानसभेच्या सहाच्या सहा मतदारसंघात भाजपच्या मेंढेंना लीड होतं, यंदा भाजपकडून मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोलेंमध्ये लढत होईल. गडचिरोली-चिमूर लोकसभेत आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आणि चिमूर या सहा विधानसभा आहेत.
2019 ला भाजपकडून अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव उसेंडी लढले होते. अशोक नेतेंना 5,19,968 तर उसेंडींना 4,42,442 मतं पडली होती. भाजपच्या नेतेंचा 77,526 विजय झाला होता. तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया या पाच ठिकाणी भाजपच्या अशोक नेतेंना लीड होतं तर अहेरीतून उसेंडी आघाडीवर होते. यंदा भाजपच्या अशोक नेतें विरुद्ध काँग्रेसनं नामदेव किरसान यांना उमेदवारी दिलीय.