मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात, बरेचदा कोणत्या ना कोणत्या विषयावर गदारोळ झालाय. आता पुन्हा मंत्री दादा भूसेंनी संजय राऊतांवर टीका करताना, शरद पवारांचा उल्लेख केला आणि अजित पवार चांगलेच संतापले. विधानसभेत नेमकं काय घडलं?, पाहुयात.
मंत्री दादा भूसेंच्या याच वक्तव्यावरुन, विधानसभेत गदारोळ झाला. संजय राऊत भाकरी मातोश्रीची खातात, पण चाकरी शरद पवारांची करतात, असं भूसे म्हणाले आणि त्यानंतर अजित पवार आक्रमक झाले. मंत्री दादा भूसेंनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पण आपण एकेरी उल्लेख केला नसून, राऊतांबद्दल बोलल्याचं भूसे म्हणालेत.
पण मंत्री दादा भूसे एवढे तापले का ?. तर त्याचं कारण आहे. संजय राऊतांचा आरोप राऊतांचं ट्विट काय होतं ते आधी पाहुयात. हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.
मालेगावातील गिरणा सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे. काही वर्षांपूर्वी अवसायनात निघालेले कारखाना वाचवण्यासाठी गिरणा बचाव समितीनं पुढाकार घेतला. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. मात्र कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवण्यात आल्याचा आरोप राऊतांचा आहे.
आता या प्रकरणात कोणत्याही यंत्रणेद्वारे चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास राजकारण सोडणार असं भूसे म्हणालेत. तसंच 26 तारखेपर्यंत माफी न मागितल्यास जागा दाखवून देण्याचा इशाराच भूसेंनी राऊतांना दिला.
राऊत आणि दादा भूसेंमधलं शाब्दिक चकमकीचं प्रकरण, राऊतांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत पोहोचलं. आम्हाला गद्दार म्हणतात, पण राऊतच महागद्दार असून आमच्या मतांवर निवडणूक आलेल्या राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हान मंत्री भूसे आणि शंभूराज देसाईंनी दिलंय.
संजय राऊतांच्या निशाण्यावर रोज सकाळी शिंदेंची शिवसेना त्यांचे मंत्री येत आहेत. पण त्यावरुनच राऊतांवर हल्लाबोल करताना, भूसेंनी पवारांचं नाव घेतलं आणि विधानसभेत हंगामा झाला पण विधानसभा अध्यक्षांनी एकेरी उल्लेख असल्यास काढणार असल्याचं सांगितलं आणि प्रकरण शांत झालं.