मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहेत. या सीसीटीव्हीत स्टंपने हल्ला करणारे आरोपी कैद झाले आहेत. विशेष म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन आरोपींचे फोटोही समोर आले आहेत. या आरोपींचा शोध पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तब्बल आठ पथकं तैनात केली आहेत. संबंधित सीसीटीव्हीत एक आरोपी हातात स्टंप घेऊन जाताना दिसतोय आणि मध्येच टाकून पळतानाही दिसतोय. हल्ल्यानंतर पळत असतानाचा हा सीसीटीव्ही आहे. आरोपी हे टॅक्सीमधून आले होते आणि टॅक्सीमधून पळून गेले, असं पोलीस चौकशीत समोर आलंय.
संदीप देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. एरव्ही त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र आज ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना माहहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र देशपांडे यांनीही चांगलाच प्रतिकार केला. हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरावर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले.
हल्ल्यानंतर जखमी देशपांडेंना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेही आले. तर गंभीर इजा नसल्यानं उपचार करुन संदीप देशपांडेंना डिस्चार्ज देण्यात आला. अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय.
संदीप देशपांडेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, हल्लेखोरांनी वरुण सरदेसाई, संजय राऊतांना लिहिलेलं पत्र, आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेचा उल्लेख केल्याचं सांगितलंय. तर विधानसभेत भाजपचे आमदार नितेश राणेंनीही देशपांडेंवरील हल्ला प्रकरणात विधानसभेत वरुण सरदेसाईंचं नाव घेतलंय.
संजय राऊतांनी देशपांडेवरील हल्ल्याचा निषेध केलाय. पण हल्ल्यावरुन स्वत: देशपांडेचा रोख संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंवर आहे. त्यातच अमेय खोपकरांनी या दोघांनाही चिंधी चोर गुंड म्हटलंय. गेल्या काही महिन्यांआधी संदीप देशपांडे ठाकरे गटाच्या नेत्यांवर आक्रमक झालेत. कोरोनाच्या काळापासून, त्यांनी महापालिकेत घोटाळा झाल्याचाही आरोप केलाय.