माथेरानच्या रोपवेची वाट पहाण्यात एक पिढी गेली, सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी

| Updated on: Dec 10, 2022 | 2:01 PM

एकाच रोपवेवर दोन भिन्न प्रकारच्या केबल कार प्रवासाचा थरारक अनुभव यामुळे मिळणार होता. त्यामुळे कदाचित असा दुहेरी लाभ देणारा हा देशातील एकमेव रोपवे ठरेल असे म्हटले जाते. सध्या माथेरानच्या घाटमाथ्याला जाण्यासाठी विविध वाहनानी साडेतीन ते पाच तास लागतात. या रोपवेने हे अंतर अवघ्या 20 मिनिटात संपेल, पर्यटकांना त्यांची वाहने भिवपुरी येथे पार्क करण्याची सोय असल्याने माथेरानमधील वाहनांची गर्दीही कमी करण्यास त्यामुळे मदत मिळणार असल्याचे कंपनीचे म्हणणे होते.

माथेरानच्या रोपवेची वाट पहाण्यात एक पिढी गेली, सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी
ropeway_matheran
Image Credit source: ropeway_matheran
Follow us on

मुंबई : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान ( MATHERAN ) येथे नुकतीच ई- रिक्षांना ( E-Rickshaw )  परवानगी दिली आहे. माथेरानचे पर्यावरणीय रक्षण करण्यासाठी असलेल्या कठोर नियमांमुळे पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांना येथे मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे येथे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील प्रसिद्ध मिनीट्रेन ( TOYTRAIN ) बंद पडल्यास माथेरानचा संपर्कच तु़टतो. येथे गॅस सिलींडरची वाहतूक करण्यासाठी देखील खेचरांचा वापर करावा लागतो.

माथेरान नगरपरिषदेने 20 वर्षांपूर्वी माथेरानमध्ये रोप वे बांधण्यासाठी मंजूरी दिली होती. मात्र अजूनही या प्रकल्पाची सुरुवात झालेली नाही. माथेरानला येण्यासाठी नेरळला उतरून नंतर मिनीट्रेन किंवा वाहनाने येता येते. मिनीट्रेन पावसात बंद असते. त्यावेळी वाहनांनी येण्यासाठी केवळ दस्तुरीनाका (अमन लाॅज ) पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.

माथेरानला येण्यासाठी दस्तुरी नाक्यापर्यंत शेअर टॅक्सीने यावे लागते. राज्य परिवहन महामंडळाने काही वर्षांपूर्वी सुरू केलेली मॅक्सी कॅब सेवा येथील स्थानिकांनी  बंद पाडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नॅरोगेज मार्गावरील ऐतिहासिक मिनी ट्रेन शिवाय घाटमाथ्यावर येण्यासाठी दुसरा सक्षम पर्याय नाही. पावसाळ्यात ही नेरळ ते माथेरान थेट मिनीट्रेन सेवा बंद असते. त्यामुळे अमन लाॅज ते माथेरान शटल सेवा चालविण्यात येते असते. परंतू या मार्गाने प्रवासाला काही तास लागतात.

माथेरान येथे रोपवे बांधण्याचा ठराव माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने 20 वर्षांपूर्वी केला होता. परंतू अजूनही त्याला मुहूर्त सापडलेला नसल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारने नुकतीच माथेरान येथे ई-रिक्षांना प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली आहे.

माथेरान रोपवेसाठी माथेरान रोपवे प्रा.लि.कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीत आता टाटा इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वाधिक शेअर आहेत. परंतू 20 वर्षे हाेऊनही कंपनीला रोपवे काही बांधता आला नाही. त्यामुळे एमएमआरडीएने हा प्रकल्प ताब्यात घेऊन बांधावा अशी मागणी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडेकर यांनी टीव्ही नाइन मराठी वेबसाईटशी बोलताना केली आहे.

सर्वोच्च न्यायालय, पर्यावरण आणि वनमंत्रालय अशा सर्वांची परवानगी मिळून अखेर 26 डिसेंबर 2012 रोजी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिली आहे. अशा सर्व यंत्रणांची परवानगी मिळूनही हा प्रकल्प रखडला आहे.

कर्जत- भिवपूरीजवळील पाली-भुतीवली येथे या रोपवेचे बेस स्टेशन तयार करण्यात येणार असून एकूण अंदाजे 4.7 कि.मी. इतकी आहे. हा देशातील सर्वात लांब असलेल्या रोपवे पैकी एक आहे. जमीनीपासून 750 मीटर उंचीवरून हा रोपवे जाणार आहे. दर तासाला 500 ते 600 प्रवाशांची वाहतूक करण्याची त्याची क्षमता आहे. भिवपुरी हे मुंबईपासून 80 किमी असून येथे पोहचण्यास दीड ते दोन तास लागतात.

या रोपवेचे वरचे स्थानक माधवजी पॉईंट येथे असून ते माथेरानच्या मध्यभागी आहे. हा रोपवे दोन भागात विभागलेला असून यात प्रवाशांना एकाच रोपवेवर दोन पद्धतीच्या केबलकारची मजा घेता येणार आहे. पहिल्या सेक्शनमध्ये सातत्याने धावणारी डिटॅचेबल मोनोकेबल असून त्याची लांबी 2900 मीटर आहे. दुसरा सेक्शनमध्ये रिव्हर्सेबल बायकेबल जीगबॅकचा असून त्याची लांबी 1700 मीटर आहे.