व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना मुंबईतून अटक

| Updated on: Jun 18, 2019 | 9:13 PM

व्‍हेल माशाची उलटी जेव्हा घनरुप घेते तेव्हा त्यापासून एक विशिष्ट प्रकारचा दगड तयार होतो. या दगडाला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याला समुद्रात तरंगणारं सोनंही म्हटलं जातं. या दगडापासून मोठ्या ब्रॅण्डचे परफ्यूम तयार केले जातात. 

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना मुंबईतून अटक
Follow us on

मुंबई : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विद्याविहार परिसरातून पोलिसांनी कृष्ण जी. दुपारे (वय 53) या तस्कराला ताब्यात घेतलं. घाटकोपरमध्ये व्हेल माशाची उलटीची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी आणि वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई करत या तस्कराला रंगेहात अटक केली. या तस्कराकडून पोलिसांनी 1 किलो 130 ग्राम वजनाची उलटी जप्त केली. परदेशी बाजारात याची किंमत जवळपास 1 कोटी 70 लाख रुपये आहे.

पोलिसांनी कृष्ण जी. दुपारेला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने दुपारेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर दुपारे याच्या माहितीवरुन पोलिसांनी त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक केली. सध्या पोलीस या दोघांचीही कसून चौकशी करत आहेत. तसेच, व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीमागे कुठला मोठा रॅकेट तर नाही ना याचाही तपास सुरु आहे.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी का?

व्‍हेल माशाची उलटी जेव्हा घनरुप घेते तेव्हा त्यापासून एक विशिष्ट प्रकारचा दगड तयार होतो. या दगडाला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याला समुद्रात तरंगणारं सोनंही म्हटलं जातं. या दगडापासून मोठ्या ब्रॅण्डचे परफ्यूम तयार केले जातात.

गेल्या काही वर्षांपासून कोकण किनाऱ्यावर व्हेल मासा दिसू लागला आहे. त्यानंतर येथे या व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणारी टोळकीही मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली. व्हेल माशाच्या उलटीपासून तयार झालेला हा दगड शोधण्यासाठी महिनाभर तर कधी वर्षभराचा कालावधीही लागतो. नुकतंच व्हेल माशाच्या उलटीपासून तयार झालेला 11 किलोचा दगड तस्करांच्या हाती लागला. परदेशी बाजारात याची किंमत जवळपास 22 कोटी रुपये इतकी आहे.

नेमका हा दगड आहे तरी काय?

अनेक वैज्ञानिक या दगडाला व्हेल माशाची उलटी सांगतात, तर काही याला माशाचं मल असल्याचं सांगतात. व्हेलच्या शरीरातून एक अनावश्यक द्रव्य बाहेर पडतो. हे द्रव्य माशाच्या आतड्यांमधून बाहेर पडत असतं. हे द्रव्य व्हेल पचवू शकत नाही म्हणून तो शरिराबाहेत फेकला जातो. अनेकदा हे द्रव्य रेक्टममधून बाहेर पडतं, तर कधी कधी व्हेल उलटीद्वारे हे द्रव्य बाहेर टाकते. वैज्ञानिक भाषेत याला एम्बरग्रीस असं म्हणतात.

एम्बरग्रीस हे व्हेलच्या आतड्यांमधून निघणारा काळ्या रंगाचा ज्वलनशील द्रव्य आहे. व्हेलच्या शरिराच्या आत तिच्या सुरक्षेसाठी या द्रव्याची निर्मिती होते. यामुळे व्हेल माशाच्या आतड्यांचा स्क्विडच्या (एक समुद्री जीव) टोकदार चोचेपासून बचाव होतो.

व्हेल मासा हा समुद्रात खूप खोलवर असतो. त्यामुळे त्याची उलटी किनाऱ्यापर्यंत यायला बराच वेळ लागतो. सूर्य प्रकाश आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याने हे द्रव्य घनरुप घेतं. हे दिसायला एखाद्या दगडाप्रमाणे दिसतं. सुरुवातीला या उलटीचा मलप्रमाणे वास येतो. मात्र, काही वर्षांनंतर यातून सुगंध येऊ लागतो. याचा सुगंध बराच वेळ राहातो. याचा उपयोग परफ्यूम बनवण्यात केला जातो. म्हणून परदेशी बाजारात याला मोठी मागणी आहे. एम्बरग्रीसला तरंगणारं सोनंही म्हटलं जातं.

परफ्यूम व्यतिरिक्त आणखी कुठे या उलटीचा वापर होतो?

एम्बरग्रीस हे साधारणपणे परफ्यूम तसेच इतर सुगंधित वस्तू तयार करण्यासाठी वापरलं जातं. एम्बरग्रीसने तयार झालेलं परफ्यूम अनेक देशांमध्ये मिळतं. प्राचीन मिस्त्रमध्ये यापासून सुगंधित अगरबत्ती आणि धूप बनवलं जात होतं. आधुनिक मिस्रमध्ये यापासून सिगारेटला सुगंधित बनवलं जातं. प्राचीन चीनी लोक या पदार्थाला ‘ड्रॅगनने थुंकलेला सुगंध’ असं म्हणतात.

या पदार्थाचा उपयोग जेवणाची चव वाढवण्यासाठी, तसेच काही देशांमध्ये लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही केला जातो. मध्य युगात यूरोपीय लोक डोकेदुखी, सर्दी, फीट आणि इतर काही आजारांवर उपाय म्हणूनही या पदार्थाचा वापर करत असत.

संबंधित बातम्या :

फेसबुकवर विदेशी तरुणाशी चॅटिंग अंगलट, महिलेला नऊ लाखांचा गंडा

लग्नाला नकार देणाऱ्या तरुणावर तरुणीचा अॅसिड हल्ला

उन्हाने तापलेल्या फरशीवर कपडे काढून बसवलं, चिमुकल्याचा पार्श्वभाग जळाला

इशकजादे!! आधी दारु प्यायले, मग एकमेकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या!