मुंबई: आमदार आणि खासदार पक्षाला सोडून गेल्यानंतर ठाकरे गट कमकुवत झाला आहे. पक्षाला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही लवकरच राज्यव्यापी दौरे सुरू करणार आहेत. एकीकडे ठाकरे कुटुंब पक्ष वाढवण्यासाठी मैदानात उतरलेला असतानाच दुसरीकडे पक्षातील महिला नेत्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. महिला नेत्यांची गटबाजी ही थेट रश्मी ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या महिला नेत्यांची कानउघाडणी करावी लागल्याचं वृत्त आहे.
मातोश्री निवासस्थानी दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची काल बैठक पार पडली. या बैठकीला महिला नेत्या उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेवरच बोट ठेवलं. तुमच्या आपआपसातील स्पर्धेमुळे आपण चांगली माणसं गमावत आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महिला नेत्यांचे कान टोचले. उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे कान टोचल्याने या महिला नेत्यांच्या भुवया उंचावल्या.
शिवसेनेत फूट पडली असली तरी ठाकरे गटात विविध विचारधारा, पक्ष आणि संघटनांतील कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करत आहेत. हे प्रवेश सुरू असतानाच ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये मात्र स्पर्धा सुरू झाली आहे. त्याची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली असून या नेत्यांची कानउघाडणी केली आहे.
आशा मामिडी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. मामिडी शिंदे गटात जाण्यामागे ठाकरे गटाच्या महिला आघाडीतील गटबाजीचा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मामिडींच्या प्रवेशावर थेट बोलणं उद्धव ठाकरेंनी टाळलं. पण महिला नेत्यांमधील गटबाजींवर भाष्य केलं.
एकीकडे सुषमा अंधारे, संजना घाडी आणि ज्योती ठाकरे तर दुसरीकडे नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विशाखा राऊतांची गटबाजी सुरू आहे. महिला आघाडीतील या गटबाजीची रश्मी ठाकरेंनीही घेतली दखल घेतली आहे. दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला रश्मी ठाकरेसुद्धा उपस्थित होत्या, असं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, या गटबाजीवर महिला नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी महिला नेत्यांचे कान टोचल्याचं समोर आल्याने ठाकरे गटात सर्व काही अलबेल नसल्याचं चित्रं आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच महिला नेत्यांमधील गटबाजी उघड झाली आहे. उद्धव ठाकरे पक्षातील ही अंतर्गत गटबाजी कशी हाताळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.