मुंबई : महाविकास आघाडीमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अजून आपलं आमरण उपोषण सोडलेलं नाही. त्यांची समजूत घालण्याचे राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान दुसऱ्याबाजूला काही राजकीय हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिलव्हर ओक निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आधीपासून सिलव्हर ओकवर उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी कसे पोहोचले? असा प्रश्न पडू शकतो. त्याच उत्तर आहे की, उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.
इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक झाली. या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. उद्या 13 सप्टेंबर आहे. शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीची समन्यव समितीची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीसंबंधी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सिलव्हर ओकवर पोहोचले असतील. यापुढे इंडिया आघाडी संदर्भात महत्त्वाचे निर्णय समन्यव समिती घेणार आहे. या समितीत इंडियाच आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी आहेत. जागावाटप हे इंडिया आघाडीसमोरच मुख्य आव्हान असेल. त्याशिवाय येत्या 18 सप्टेंबरपासून संसदेच विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. त्याची रणनिती सुद्धा समन्वय समितीच्या बैठकीत ठरवली जाऊ शकते. NDA ला सभागृहात कसं घेरायच? त्याशिवाय एनडीएला पुन्हा सत्तेपासून रोखण्यासाठी काय रणनिती आखायची? याची चर्चा बैठकीत होऊ शकते.
पवार आणि ठाकरेंमध्ये चर्चेचा मुख्य मुद्दा काय असेल?
महाविकास आघाडीतील राज्यातील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर पवार आणि ठाकरेंमध्ये चर्चा होऊ शकते. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असे तीन पक्ष आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. कोणाच्या वाट्याला किती जागा येणार? हा मुख्य मुद्दा असेल. इंडिया आधाडीच्या लोगो संदर्भातही बैठकीत चर्चा होऊ शकते.