विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना कधी काळी पक्के शेजारी असणारा उद्धव ठाकरे गट आणि भाजपात आता पुन्हा कलगी तूरा रंगला आहे. महाविकास आघाडी स्थापल्यापासून भाजप आणि शिवसेनेत वाकडं झालं. तर शिवसेनेत उभी फुटू पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि भाजपात विस्तव सुद्धा जात नाहीत. त्यातच आता हिंदुत्वाच्या मुद्यावरुन ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.
उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
आम्ही भाजपच्या नादी लागलो. त्यांनी जे वातावरण तयार केले ते आजही आहे. त्यातून ते बाहेर आणू इच्छित नाही. लोकांची घरे पेटवणं हे आमचं काम नाही. आमचं काम घरे विझवण्याचं आहे. मी भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं नाही. त्यांचं थोतांड हिंदुत्व आमचं नाही हे समजलं आणि म्हणून मी त्यांपासून वेगळा झालो. त्यामुळे तुम्हाला माझं हिंदुत्व प्रबोधनकारांचं वाटतं. तसं नाही. हिंदुत्व हे हिंदुत्व आहे. सत्ता येई पर्यंत भाजप सबका साथ म्हणते. निवडून आल्यावर मित्रांचा विकास. कठीण काळात भाजपला साथ दिली. माडीवर चढले आणि त्यांनी आम्हाला लाथ घातली. हा त्यांचा आप मतलबीपणा आहे.
संजय शिरसाट यांचे चर्चेत विधान
“2019 च्या निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेनेला बहुमत दिलं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू झाला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावं अशी मागणी शिवसेनेची होती. संजय राऊत उद्धव ठाकरेंचं कान भरायचे. त्यामुळे हा वाद वाढतच गेला. भाजपने पहिले अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी शिवसेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावं. भाजपने उद्धव ठाकरेंना पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास संमती दर्शवल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाहीत. गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांना सांगितलं की बोलणं करून द्या, पण त्यांचंही त्यांनी ऐकलं नाही.”, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला साकडं
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करावं. मी तुमच्या साक्षीने पाठिंबा देतो. मला महाराष्ट्राचं हित पाहिजे. माझ्या डोक्यात वेडीवाकडी स्वप्न नाही. मी पुन्हा पुन्हा येईन म्हणणार नाही. राज्याच्या हितासाठी जे करायचं ते करीन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याच्या आड काळी मांजरं येत असतील तर त्यांच्या पेकाटात लाथ घालणार नाही असं नाही. माझ्या दोन पिढ्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजे. दोन ठगांची गुलामगिरी पत्करणार नाही. का म्हणून पत्करणार, असा सवाल त्यांनी केला.