सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने आज आक्रमक आंदोलन केले. राज्यभरात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गेट ऑफ इंडिया असा इशारा दिला. हे सरकार सत्तेतून खाली खेचा अशी संतप्त प्रतिक्रिया महाविकास आघाडीने दिली.
गेट ऑऊट ऑफ इंडिया
गेट वे ऑफ इंडिया आपल्या देशाचं प्रवेशद्वार आहे. इथे शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे. त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट. चालते व्हा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणूनच इथे बसलो आहोत. देशाचे पंतप्रधान आले. त्यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर तुम्हीला महाराष्ट्राने ठेवलं नसतं. माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ही मग्रुरी मान्य आहे का. माफी मागताना मग्रुरी कसली, असा सवाल करत हे माफीचे केवळ नाट्य असल्याचा दावा केला.
मुख्यमंत्र्यांसोबत दीड शहाणे
स्टेजवर मुख्यमंत्री बसले होते. सोबत दीड शहाणे, दोन शहाणे होते. एक फूल दोन हाफ होते. एक हाफ तर नाचत होता. मोदींनी माफी कशासाठी मागितली. पुतळा पडला म्हणून माफी मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली. भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालण्यासाठी मागितली, असा सवाल त्यांनी विचारला.
मोदी तुम्ही आला. निवडणुकीसाठी आला होताच. आम्हाला अभिमान वाटला होता. नौदल दिन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होतोय याचा आनंद वाटला. तेव्हा घाईत पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते मोदी गॅरंटी आहे. हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल. माफी तुम्ही कुणाकुणाची मागणार. भ्रष्टाचाराने पुतळा कोसळला त्याची माफी मागणार, राममंदिर गळतंय त्याची माफी मागणार, की घाई गडबडीने बांधलेलं संसद गळतंय म्हणून माफी मागणार, असा चिमटा त्यांनी मोदी यांना काढला.
चुकीला माफी नाही
महाराष्ट्रात जे वातावरण चाललं आहे. त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला. शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले. तुम्ही राजकारण करत आहेत असा आरोप आहे. मी म्हणेल ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे.खाजवत बसत आहे. खाजवू द्या त्यांना. चुकीला माफी नाही, असा सज्जड दम त्यांनी सत्ताधाऱ्यांना भरला.