मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पक्षासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये चलबिचल होऊ शकते. पक्ष पुन्हा डॅमेज होऊ शकत असल्याची भीती असल्याने आता ठाकरे गटाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर एक बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय मोठा निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार आणि खासदारांनाही बोलावण्यात आलं आहे. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीवर निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने कशाच्या आधारावर पक्षाचं चिन्हं आणि नाव शिंदे गटाला दिलं. त्याच्यावर विचार करण्यात येणार असून त्यानंतर आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असल्याने सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आजच्या बैठकीत निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर होणाऱ्या पक्षावरील परिणामांची चर्चाही करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे धनुष्यबाणाशिवाय या निवडणुका लढाव्या लागणार आहेत. त्यामुळे चिन्हासाठी अनेकजण शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कुणीही पक्ष सोडून कुठे जाऊ नये म्हणून काय करता येईल यावरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं तरी निकाल लगेच लागेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे तोपर्यंत मशाल चिन्हावर निवडणुका लढवण्यावरही आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. तसेच ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हेच पक्षाचं नाव घेऊन जायचं की शिवसेना या नावाच्या मागे पुढे काही शब्द जोडायचा यावरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
दरम्यान, शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर मुंबईत आणि महाराष्ट्रात शिवसैनिकांकडुन निषेध केला जातोय. दादरमध्ये लोकशाहीची हत्या.. असा मजकूर लिहिलेले बॅनर्स लागले आहेत.
शिवसेना भवनाखालीही एक बॅनर लागला आहे. त्यावर निर्णय काहीही असो. आम्ही शिवसैनिक कायम मातोश्री आणि ठाकरे परिवारासोबत एकनिष्ठ राहणार आहोत, असं या बॅनरवर लिहिलं आहे. शिवसैनिकांनी बॅनरवरून आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.