मुंबई : ठाकारे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. यावेळी बोलताना ठाकरेंनी अपात्र आमदार प्रकरण आणि मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ठाकरेंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव न घेता निशाणा साधला. त्यासोबतच या सरकारला डिसेंबर महिन्यात आपण निरोप देऊ म्हणत ठाकरेंनी तारीखही सांगितली आहे.
दसऱ्याच्या माझ्या भाषणात बोललो होतो, सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व काय असणार आहे. त्यावर आधारीत देशातील घटना ती आणि देशाची लोकशाही टिकणार की नाही याकडे जगाचं लक्ष आहे. आपला देश जागतिक लोकसंख्येत नंबर एक आहे. त्यामुळे सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली असेल तर सर्वोच्च न्यायालय काय करते हे पाहावं लागणार आहे. लवाद सर्वोच्च न्यायालयाचे निकाल मानणार की नाही. लवाद सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आपल्या मर्जीने आणि मस्तीने मानणार नसतील तर या देशाची हाल जे काही होतील ते सावरता येणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
घटनेने न्याय निवडा होईल याची खात्री आहे, राज्याला न्यायदानाची परंपरा आहे. रामशास्त्री बाणा आपण म्हणतो. सत्ताधीश कितीही बलवान असला तरी त्याच्यासमोर न झुकता न्याय देण्याची परंपरा महाराष्ट्राने दिली आहे. त्याच परंपरेला जागून केवळ शिवसेनेलाच नाही तर लोकशाहीला न्याय मिळेल अशी खात्री आहे. अशी खात्री आहे असं वाटल्यामुळे 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला आपण निरोप देऊ असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना आदेश दिला आहे, आपल्याकडे तो आदेश आला आहे. नार्वेकर म्हणाले, मी आदेश वाचला नाही. त्यामुळे मी हा आदेश वाचून दाखवत आहे. मी माझ्या आमदारांना सांगणार आहे की, जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्याची कॉपी त्यांना द्या आणि त्यांच्या समोरही वाचन करा, उद्धव ठाकरे म्हणाले.