मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ((Uddhav Thackeray) यांची खेडमध्ये मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच खेडमध्ये जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभेच्या आधी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीने जाहीरपणे टोला लगावला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून, जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. स्मिता यांचा जयदेव ठाकरे यांच्यासोबत घटस्फोट झालाय. पण त्या ठाकरे कुटुंबाच्या सदस्य आहेत. असं असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.
स्मिता ठाकरे याच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने महिला दिन विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. आम्हाला असाच मुख्यमंत्री पाहिजे होता जो कमी वेळात जास्त काम करेल, असं स्मिता ठाकरे म्हणाल्या. वारसदार वारसदार म्हणून चालत नाही. तुम्ही वारसदार मग आम्ही कोण दारसदार? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
“जीत के आगे जीत हार के आगे जीत”, अशा शायरीतून त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. “आम्हाला असाच मुख्यमंत्री पाहिजे होता. नुसतं वारसदार वारसदार करुन चालत नाही ना? तुम्ही वारसदार मग आम्ही कोण दारसदार?”, असा सवाल स्मिता ठाकरे यांनी केला.
“ठाण्यामध्ये एखादं कुठलंही काम असो, किंवा महाराष्ट्रात कुठलंही काम असेल, मी फार जवळून पाहिलंय की साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलंय की, अरे एकनाथला फोन कर, त्याला सांग हे हे कर म्हणजे होऊन जाईल. आज जे खंदे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे हे खंदे शिवसैनिक आहेत”, असं स्मिता ठाकरे म्हणाले.