भाजपचं हिंदुत्व अमान्य, आमचं हिंदुत्व… उद्धव ठाकरे कडाडले

| Updated on: Mar 03, 2024 | 7:42 PM

उद्धव ठाकरे यांनी धारावीमधील सभेमध्ये भाजपवर जोरदार टीका केलेली पाहायला मिळालं. भाजपचं हिंदुत्व अमान्य, आमचं हिंदुत्व चुल पेटवणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यासोबतच पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर ठाकरेंनी जोरदार टीका केली.

भाजपचं हिंदुत्व अमान्य, आमचं हिंदुत्व... उद्धव ठाकरे कडाडले
Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई, दिनांक 3 मार्च : आमचं हिंदुत्व वेगळं आहे. तुमचं वेगळं आहे. आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही. आमच्यासोबत समाजवादी आले, मुस्लिम येतात. आमचं हिंदुत्व चुल पेटवणारं आहे. तुम्ही पेटवणारे आहे. आमचं हिंदुत्व गाडगेबाबांचं असल्याचं म्हणत’ उबाठा’ गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.

रोजगार कुठे आहे. जिथे जातो तिथे असंतोष आहे. शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी आक्रोश करत आहे. सर्वांच्या मनात ईव्हीएमची काळजी वाटत आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळा केला तर असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. ईव्हीएम घोटाळा करून बघाच. देशभर आक्रोश आहे. मी लोकांमध्ये जातो. ग्रामीण भागात माझ्यासभेत शेतकरीच असतात. मी त्यांना विचारतोय महाविकास आघाडीने जी कर्जमुक्ती केली ती मिळाली की नाही विचारतो. त्यांना जाहीरपणे विचारतो. चॅनल समोर विचारतो. हे घटनाबाह्य सरकार आलं. त्यांची मदत पोहोचलेलीच नाही. कर्जमाफी जाऊ द्या. कर्जाचा डोंगरच आहे. सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एकच प्रोडक्ट कितीवेळा लॉन्च करणार. किती वेळा घासलं तरी त्यातून काय बाहेर पडणार. मोदींशिवाय भाजपकडे कोण पर्याय आहे. आम्ही मोदीविरोधात एकत्र आलो नाही. आम्ही हुकूमशाही विरोधात आहोत. हुकूमशाहीला एकच पर्याय म्हणजे लोकशाही. आम्ही देशभक्त म्हणून एकत्र आलो आहोत. निवडणुकीपुरती जात पात बाजूला ठेवा. देशाला वाचवा. देश टिकला तर आपण धर्म टिकवू शकतो. देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे. डोळ्यासमोर देश ठेवा असं माझे आजोबा सांगायचे. आशीर्वाद द्यायला देव पाहिजे पण हे देव डोळ्यासमोर ठेवताय आणि देश कुठे आहे म्हणत ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, मणिपूरला गेला नाही. पण लक्षद्वीपला जाऊन बुडून आला. द्वारकेत पाण्यात जाऊन आला. तुम्ही समुद्राच्या तळाला जाऊ शकता पण मणिपूरला जात नाही. कारभार नाही, हे नुसताच भार आहेत. केवळ रामनामाचा जप नको, रामराज्य आणा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.