लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल संसदेत भाषण केलं. त्यांच्या या भाषणाची देशभरात चर्चा होत आहे. राहुल गांधी यांनी काल बोलताना भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आरएसएस म्हणजे हिंदुत्व नाही, असं ठणकावून सांगितलं. राहुल गांधींच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी हिंदुंचा आणि हिंदुत्वाचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना राहुल गांधींवर प्रति शाब्दिक हल्ला केला. यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या पैकी कुणी हिंदुत्वाचा अपमान करणार नाही आणि कुणी सहन देखील करणार नाही. राहुल गांधी म्हणाले ते योग्यच आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही… हे मी याआधीही म्हणालो आहे. मी भाजपला सोडलेलं आहे. हिंदुत्व सोडलेलं नाही. इथून पुढेही हिंदुत्व सोडणं शक्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, असं राहुल गांधींनी ठासून सांगितलं आहे. पण भाजपच्या लोकांनी राहुल गांधींवर हिंदुत्वाचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आहे. पण त्यांनी हिंदुत्वाचा अपमान केलेलाच नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
राहुल गांधी काल बोलताना जय संविधान म्हणाले. त्यांच्या ‘जय संविधान’ म्हणण्याने काहींना मिर्च्या झोंबल्यात. ज्यांना ‘जय संविधान’ मिर्च्या झोंबल्यात त्यांच्या निषेधाचा ठराव दोन्ही सभागृहात मांडावा आणि तो लोकसभेत पाठवावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘जय संविधान’ म्हणत राहुल गांधी यांनी कालच्या लोकसभेतील भाषणाला सुरूवात केली. गेल्या 10 वर्षात पद्धतीशीरपणे संविधानावर, ‘आयडिया ऑफ इंडिया’वर भाजपकडून हल्ला केला जात आहे. काही आमच्या नेत्यांवर हल्ल्ला केला जात आहे. लोकांना कारागृहात टाकलं जात आहे. लोकांना धमकावले जात आहे. खासदारांना निलंबित केलं जात आहे. पण आम्ही देशांच्या संविधानाचं रक्षण केलं आहे. देशातील जनतेने देशाच्या संविधानाचं रक्षण केलं आहे, असं राहुल गांधी यांनी काल लोकसभेत म्हटलं.