मुंबई : लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UddhavThackeray) यांनी केला आहे. मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करत असताना भाजपासह शिवसेनेतून बंड करून निघालेल्या आमदारांवर टीका केली. तसेच हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक (Election) घेऊन दाखवा, असे आव्हानही दिले. सध्याच्या घटनेवरून त्यांनी राज्यात कशापद्धतीने घटनेची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, याची माहिती दिली. एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले. तसेच भाजपावर (BJP) यावेळी त्यांनी टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणार आहे.
राज्यात राज्यघटना आहे, की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनातज्ज्ञांना विनंती आहे, की आपण घटनातज्ज्ञ आहात. सध्या जे सुरू आहे ते घटनेला धरून सुरू आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरू आहे, त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा, असे आवाहन त्यांनी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या, असे ते म्हणाले. त्याचबरोबर असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल आणि तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिवसेनेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयातही दाद मागितली जाणार आहेय बैठक सुरू होण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बंडखोरांवर टीका करताना ते म्हणाले होते, की जन्मपक्षात जर ते असे करू शकतात, तर कर्म पक्षातही करणार. त्यामुळे जिकडे ते गेले आहेत, त्यांनीही सावध राहावे, असा इशारा त्यांनी भाजपालादेखील दिला आहे. तर निवडणुकीला आम्ही तयार आहोत. दुप्पट ताकदीने शिवसेना पुढे येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वासही व्यक्त केला होता.