मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला आर्थिक राजधानीमध्ये खिंडार पडलं आहे. मिलिंद देवरा यांच्या घराचं आणि काँग्रेस पक्षाचं गेली साडे पाच दशक नातं आहे. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेस पक्षातील मोठे नेते होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर येथून भारत जाडो न्याय यात्रा सुरू केली आहे. देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेंचं धनुष्य हाती घेण्याचं ठरवलं आहे. मिलिंद देवरा यांच्या या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं बोललं जात आहे? उद्धव ठाकरे यासाठी कसे जबाबदार? ठाकरे यांचा देवरा यांच्या राजीनाम्याशी काय संबंध? जाणून घ्या.
शिवसेना पक्ष आता दोन गटात विभागला गेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गट ही प्रमुख शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. येत्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा सोडण्यास नकार दिला आहे. आता राज्यात महाविकास आघाडी असल्याने त्या ठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनाच तिकिट मिळणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी थेट शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा.
लोकसभा निवडणुकीमध्ये 2014 साली मोदी लाटेमुळे मिलिंद देवरा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्येही मिलिंद देवरा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सलग दोनवेळा देवरा यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं. यंदा I.N.D.I.A. युतीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे एकत्र असल्याने देवरा यांना तिकिट मिळालं नसतं.
मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात जाण्यामागे मोठं कारण आहे. ते म्हणजे शिंदे गटात गेल्याने त्यांना परत एकदा तिकिट मिळणार आहे. भाजप आणि शिंदे गटाची युती असली तरीसुद्धा शिंदे गटच या जागेवरून निवडणुक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊनही देवरा यांना तिकिट मिळालं नसतं. म्हणूनच गेल्या 56 वर्षांचा काँग्रेससोबतचा प्रवास थांबवण्याचा निर्णय देवरा यांनी घेतला.