शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. “लढाईला तोंड फुटतंय. हर हर महादेव ही महत्त्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी भेटल्या. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकड्यात गेलात तर तोडू”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. “भाजप म्हणजे चोर माणसं. राजकारणातील षंढ माणसे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. मोदींचे भाषण बघताना आता कीव येते. १० वर्षे काय अंडी उबवली?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“आयुष्यातील हे सर्वात मोठे आव्हान. यानंतर आव्हान देणारा कुणी उरला नाही. शिवसेनेची तळपती तलवार आहे. त्यांचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “मुंबई ओरबाडताना मी गप्प बसू शकत नाही. आलात तर तोडून टाकू”, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. “हे व्यापारी आपल्यात फूट पाडत आहेत. एवढे खाताय ते जातंय कुठे? खायला काही मर्यादा आहेत की नाही? धनाढ्य आणि चोऱ्यामाऱ्या करणारे दुबार मतनोंदणी करतायत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्यांच्या हातात जाईल. मराठीला प्रवेश नाही म्हणतात. पहिले कानफाट फोडा. गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करत आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
“धारावीकरांना मुलुंड, दहिसर, मिठागरात टाकायचे आहे. आपले सरकार आल्यावर धारावीचे टेंडरच रद्द करायचे आहे. कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. सगळीकडे पाणी तुंबतंय. हे विकासपुरूष आहेत? आरेचा भूखंड मुंबई बँकेला देत आहेत. त्यांचा भ्रष्टाचारी तिथे बसलाय ना. फनेल झोनमध्ये सध्या हवेतला टीडीआर काढत आहेत. अदानी माझा लाडला सुरूय. ही मुंबईच्या अस्तिवाची लढाई आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेच पाहिजे. राहिलेली गुर्मीही काढू”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“बीएमसीची ९० हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता किती राहिल्या आहेत ते सांगत नाहीत. एमएमआरडीएला बीएमसीतून पैसा का? बीएमसीला भिखेला लावत आहेत. आमची सत्ता आल्यावर एमएमआरडीएला मुंबईतून हद्दपार करू. इथे महापालिका आहे. सगळे गुजरातला… आपणही जावून राहू मग गुजरातला”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.