शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “एक पिक्चर होता, हात लावेन तिथं गुदगुल्या आणि पंतप्रधान यांचं एक नवीन आहे, हात लावेन तिथं सत्यानाश”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “महाराजांचा पुतळा कसा पडतो आठ महिन्यात? हात लावू तिकडे सत्यानाश असं मोदींचं सुरू आहे. पंतप्रधान उद्या येत आहेत. मणिपूरबद्दल त्यांना बोलायला वेळ लागला. उद्या बदलापूर, बंगालबद्दल बोलतील का? मोदी म्हणाले मला उपरवाले ने भेजा. मग त्यांची मूर्ती लावून पूजा करणार का? आत्म सन्मान, आत्मा विकू नका. मंडळांना पैसा लागतो. मात्र पैसे देतो, माझा फोटो लावा, असं म्हणणाऱ्यांना हाकलून द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. “मागील दोन अडीच वर्षात जे संकट राज्यावर आलंय त्याचे विसर्जन होऊ दे एवढच आशीर्वाद मी बाप्पाकडे मागतो”, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समिती मार्गदर्शन सभा आज पार पडली. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. “आपली अनेक वर्षांनी भेट होतेय. यामध्ये आपली भेट झाली नव्हती. मध्ये काही अंतर पडलं तरी तुम्ही नातं तुटू दिलं नाही. आपली बैठक सुरु होती आणि त्यावेळी मलेरिया आणि डेंग्यू जोरात होता. पण ज्या सभागृहात बैठक होती तिथेच अळ्या सापडल्या होत्या. आता मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही. अडीच वर्ष नगरसेवक नाहीत. विसर्जनाच्या बॅनरवर इतर कोणाचे फोटो असतात. मला वाटतंय सांगतायत की, कोणाचं विसर्जन करायचं आहे”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“मंडळ चालवायला पैसा लागतो ते मान्य आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, स्वतःला विकू नका. पोलिसांवर दबाव आणला, तक्रार घेऊ नका. पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलं पाहिजे. भाजप संबंधित शाळा, महिला मुलींवर अत्याचार करेल. त्याच्या कानाखाली वाजवली पाहिजे. आपल्यातली घाण बाहेर पडली. पत्रकार मुलीवर उर्मटपणे बोलतात. बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असे म्हणतात. अजूनही त्याच्यावरती पक्षाची कारवाई नाही. त्याचा एफआयआर गायब झाला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोरोना काळात सण-उत्सव बंदी केली होती. त्यावेळी काहींच्या अंगात घुमत होतं, आम्ही का बंदी आणली ते पाहा ना? आता कोणी बंदी आणली तर जुगाडून द्या. रस्त्यावर खड्डे आहेतच. आपल्यावेळी असं व्हायचं की प्रयत्न केले जायचे, आता काहीजण पाहणीचं नाटक करतात. खड्डे मोजतात. एक चित्रपट आहे, नायक म्हणून त्यामध्ये टाईप रायटर घेऊन फिरायचा तस झालंय, सर्व धोतांड सुरूय”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
“गणपती उत्सव का सुरु केला? सर्वांना माहिती आहे. आताचा काळ आणि तेव्हाचा काळ यामध्ये थोडासा फरक असेल. आपण स्वातंत्र्य व्यवस्थित उपभोगतोय का? आज उत्सव सुरु आहेत. पण सरकार आहे की नाही तेच कळत नाही. अपाण जी मूर्ती बनवतो ती मोठी असते त्याची व्यवस्थित काळजी घेतोच. जशी आम्ही मूर्तीची काळजी घेतो पण तुम्ही मग महाराजांची काळजी का घेतली नाही? आता एकमेकांवर आरोप सुरु आहेत. पुतळा पीडब्ल्यूडीने केला, नौदलाने केला, याने केला असं सुरूय”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“राष्ट्रपती या काल पहिल्यांदा बोलल्या. पण त्या मणिपूरच्या वेळी बोलल्या असत्या तर एवढं झालं नसतं. तुमच्या अडचणी आहेत. सगळ्या अडचणीत सुनील तुम्ही आणि सर्वांनी पालिकेत जावा आणि सांगा आम्हाला त्या सोडवून द्या. समाजात आगी लावण्याचं काम केलं जातंय. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या एवढंच नाही तर बाप्पा कायम आपल्या मनात आहे. मी पुन्हा येईन, असं बोलणारे अनेक आहेत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.