मुंबई : केंद्र सरकारने मुंबईमधील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना दिला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केलीय. धारावीमध्ये काही छोटे उद्योगही आहेत त्यांचंही पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यासोबतच टीडीआरच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं असून येत्या 16 तारखेला अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं.
धारावीकरांचं पुनर्वसन जिथल्या तिथे झालं पाहिजे. माहीम निसर्ग उद्यान, रस्ते त्यात धरले आहे का? या गोष्टी स्पष्ट पाहिजे. प्रकल्प करताना सूचना आणि हरकती जनतेकडून घेतल्या जातात. सरकार म्हणते आम्ही हमी देऊ पण तुम्ही सूचना आणि हरकती घेतल्याच नाही तर हमी कसली घेणार आहात. तसं नाही झालं तर आम्ही आमची ताकद दाखवू. प्रशासनात आम्ही नसेल पण आमची ताकद रस्त्यावरची आहे.
एवढ्या मोठ्या वस्तीला पाणी कुठून आणणार. नियोजन शून्यतेमुळे मुंबईकरांचा जीव घुसमटत आहे. मुंबईत यापूर्वी कधीच एवढं प्रदूषण पाहिलं नाही. हे सरकार केवळ कंत्राटदारांसाठी काम करत आहे. रस्त्याचं कंत्राट असेल, आणखी कसली असते. प्रदूषण हे नियोजन शून्य कामामुळे होत आहे. हे सरकार कंत्राटदारांचं आहे. मुंबईचे तीन प्रकल्प यांच्या घशात घालण्याचं काम सरकार करत आहे. अभ्यूदय नगर, आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन याचा पुनर्विकास अदानी यांना देण्याचा घट आहे. पूर्वी सब भूमी गोपाल की म्हणायचो, आता सब मुंबई अदानी की असं झालं आहे. ही मुंबई मुंबईकरांनी रक्त सांडवून मिळवली, आम्ही ही मुंबई कुणाच्या घशात जाऊ देणार नाही. या सर्वांचा सरकार आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 तारखेला आम्ही मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
तुमच्या वैयक्तिक जागेवर एखादा सरकारी प्रकल्प (शाळा, रेल्वे स्थानक, रेल्वे ट्रॅक, दवाखाना इ.) होत असेल तर त्या बदल्यात तुम्हाला रोख रक्कम किंवा तेवढीच जागा चौरस फुटाने दुसऱ्या ठिकाणी दिली जाते. धारावीचा प्रकल्प अदानी यांच्याकडे असल्याने टीडीआरचे सर्व अधिकार त्यांच्याकडेच आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावरून टीडीआरचे अधिकार राज्य सरकारकडे असावे अशी मागणी केली आहे. या मुद्द्यासह धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून ठाकरे 16 डिसेंबरला अदानी यांच्या कार्यालयालवर मोर्चा काढणार आहेत. यासाठी मुंबईकरांनी यामध्ये सहभागी होण्याचं आवाहनही सर्वांना केलं आहे.