नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भारताला तब्बल 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्याचा चांगलाच पुळका आलेला दिसतोय. कारण कर्जबुडव्या विजय मल्ल्याल्या चोर म्हणणे चुकीचे आहे, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. गुरुवारी एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. इतकंच नाही तर गडकरी यांनी मल्ल्याचा ‘मल्ल्याजी’ असा उल्लेख केला.
गडकरी म्हणाले, “केवळ एकवेळ कर्ज न चुकवू शकलेल्या मल्याजींना चोर म्हणणे चुकीचे आहे. सध्या संकटात अडकलेल्या मल्ल्याचा चार दशकांपर्यंतचा वेळेवर कर्ज फेडण्याचा रेकॉर्ड आहे.”
यावेळी गडकरींनी मल्ल्याशी आपला कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक संबंध नसल्याचंही आवर्जून सांगितलं. मात्र नितीन गडकरी यांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गडकरींनी म्हणाले, “विजय मल्ल्या 40 वर्ष नियमितपणे कर्ज फेडत होता, व्याजही भरत होता. 40 वर्षांनंतर जेव्हा तो एव्हिएशन अर्थात हवाई उद्योगात आल्यानंतर, त्याच्या समस्या वाढल्या. मात्र याचा अर्थ असा होत नाही की तो चोर झाला. जो 40 वर्ष व्याज भरतो, त्याने एकदा चूक केल्याने तो फ्रॉड झाला? चोर झाला? ही मानसिकता चुकीची आहे.”
ते ज्या कर्जाचा संदर्भ देत आहेत, ते कर्ज महाराष्ट्र सरकारच्या सिकॉम युनीटने मल्ल्याला दिले होते. हे कर्ज 40 वर्षांपूर्वी दिले गेले होते. हे कर्ज माल्ल्याने वेळेवर फेडले होते. कुठल्याही उद्योगात चढ-उतार येत असतात, जर कुणी अडचणीत असेल तर आपण त्याचे समर्थन करायला हवे, असेही गडकरी म्हणाले. वाचा: सर्व कर्ज फेडेन, पण ‘ही’ अट मान्य करा : विजय मल्ल्या
26 वर्षांच्या वयात मी निवडणूक हरलो होतो, पण याचा अर्थ असा नाही की माझं राजकारणातलं करिअर संपलं, असे सागंत गडकरींनी मल्ल्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
“जर नीरव मोदी आणि विजय मल्ल्याने आर्थिक फसवणूक केली असेल, तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, पण जर कुणी अडचणीत असेल आणि आपण त्याला फसव्या/ विश्वासघातीचं लेबल लावत असू, तर आपली अर्थव्यवस्था कधीही प्रगती करु शकत नाही”, असेही गडकरी म्हणाले.
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारताकडे सोपवण्याचे आदेश लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने दिले आहेत. भारतातील बँकांना चुना लावून विजय मल्ल्या देशाबाहेर पळाला होता. लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्टात त्याच्यावर खटला सुरु होता. अखेर मल्ल्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे. भारतीय बँकांची नऊ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप मल्ल्यावर आहे.
विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने 2004 ते 2012 या काळात 17 बँकांकडून एकूण 7800 कोटी रुपयांचे कर्ज घेतला. यासाठी मल्ल्याने पर्सनल गॅरंटी दिली होती. मात्र, या बँकांचे पैसे परत न करताच विजय मल्ल्या भारतातून पळून गेला.
विजय मल्ल्यावर कुठल्या बँकेचे किती कर्ज?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)- 1,900 कोटी रुपये
पंजाब नॅशनल बँक – 800 कोटी रुपये
IDBI – 800 कोटी रुपये
बँक ऑफ इंडिया – 650 कोटी रुपये
बँक ऑफ बडोदा – 550 कोटी रुपये
यूनाइटेड बँक ऑफ इंडिया – 430 कोटी रुपये
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 410 कोटी रुपये
यूको बँक – 320 कोटी रुपये
कॉर्पोरेशन बँक – 310 कोटी रुपये
इंडियन ओव्हरसीज बँक – 140 कोटी रुपये
फेडरल बँक – 90 कोटी रुपये
पंजाब अँड सिंध बँक – 60 कोटी रुपये
अॅक्सिस बँक – 50 कोटी रुपये
इतर बँका – 603 कोटी रुपये
संबंधित बातम्या