मुंबई : मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र आपल्याकडे याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज पसरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे. हा दिवस अनेकांना माहित नसला, तरीही जागतिक स्तरावर त्याला फार महत्त्व आहे. समाजातील मासिक पाळीबाबत गैरसमज दूर व्हावेत, या दृष्टीने ‘UNICEF’ (United Nations International Children’s Emergency Fund) या संस्थेने एक अभियान राबवले आहे. या अभियानाला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा मिळत आहे.
मासिक पाळी हा चार चौघात न बोलण्याचा विषय… त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चा होत नाही. मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिनही दबक्या आवाजात मागितलं जातं. मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारीही अगदी सोनं दिल्याप्रमाणे ते अगदी कागदात गुंडाळून देतात. कशाला हवी एवढी लपवा-छपवी…मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रत्येक स्त्री परिपूर्ण होते. मात्र शहरात तसेच खेडेगावात मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज पसरले आहे. सामाजिक स्तरावर हे गैरसमज दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. मात्र या प्रयत्नांना शक्य तितकं यश आलेलं नाही.
मासिक पाळी म्हणजे नक्की काय?
मासिक पाळी म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतरत्वचा. गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते, त्याला आपण मासिक पाळी म्हणतो. मासिक पाळीची सुरुवात सर्वसाधारणपणे 12-13 व्या वर्षी होते. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीपर्यंत किंवा मोनोपॉजपर्यंत म्हणजेच 45-50 या वयापर्यंत हे चक्र सुरु असते.
मासिक पाळी आणि संसर्ग
खेडगावात किंवा ग्रामीण भागात महिला मासिक पाळीदरम्यान खराब कापड, प्लास्टिक, भुसा किंवा चक्क राखेचा वापर करतात. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरावे, यामुळे संसर्ग रोखता येतो असे अनेकदा सांगितले जाते. मात्र तरीही देशातील केवळ 30 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात.
मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या खराब कपड्यांमुळे महिलांना योनीमार्गाचे संक्रमण, मूत्राशयाचा किंवा गर्भाशयाचा संसर्ग होतो. विशेष म्हणजे यामुळे महिलांच्या गर्भधारणेत अनेक अडचणी येतात.
समज आणि गैरसमज
मासिक पाळीदरम्यानचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे मंदीरात किंवा धार्मिक कार्यात सहभागी होऊ नये. अद्याप हा समज सर्वत्र मानला जातो.
काही ठिकाणी महिलांना पाळीदरम्यान वेगळं बसवलं जातं. त्यांना घरातील कोणत्याही वस्तूला हात लावायला दिला जात नाही. यामुळे घर अशुद्ध होतं असं मानलं जातं.
त्याशिवाय मासिक पाळीदरम्यान महिलांना मसाल्याच्या किंवा लोणच्याच्या बरणीला हात लावू दिला जात नाही यामुळे ते नासतं अशी एक गैरसमजूत लोकांच्या मनात रुढ झाली आहे.
‘UNICEF’ इंडियाचं अभियान
मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने UNICEF इंडिया ने एक अभियान राबवलं आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातावर लाल रंगाचा एक ठिपका करावा लागणार आहे. हा ठिपका स्पष्ट दिसणार हवा. यानंतर हात वरील ठिपका दिसेल अशा पद्धतीने तुमचा एक सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. हा फोटो पोस्ट करताना #MenstruationMatters हा टॅग वापरायचा आहे. मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर व्हावेत यासाठी UNICEF इंडियाचा हा एक प्रयत्न म्हणावा लागेल.
Post a picture of yourself with a red dot on your palm , tagging @UNICEFIndia on #Instagram and tell the world that #MenstruationMatters to you, just like all of us.
Join us and Diipa Khosla, take the #RedDotChallenge and start a conversation on periods and menstrual hygiene! pic.twitter.com/qt92UlS6vP
— UNICEF India (@UNICEFIndia) May 26, 2019
मात्र याआधी अनेक सामाजिक संस्थांनी हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही संस्था अजूनही करत आहेत. यामुळे पाळी संदर्भातील काही जुन्या रुढी परंपरा बंद झाल्या असल्या, तरी काही परंपरा या अद्याप सुरु आहेत. या परंपरा 21 व्या शतकात तरी मोडल्या जाव्या अशी माझी एक स्त्री म्हणून खरचं अपेक्षा आहे. यामुळे भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलींना किंवा स्त्रियांना याचा त्रास सहन करावा लागणार नाही.