लालबागचा राजाचे दर्शन घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ? अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याची रुपरेषा काय?

| Updated on: Sep 08, 2024 | 12:08 PM

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबत अमित शाह हे जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार आहेत.

लालबागचा राजाचे दर्शन घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ? अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याची रुपरेषा काय?
Follow us on

Amit Shah Mumbai Visit :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वच पक्षाचे नेते अॅक्शन मो़डमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आगामी निवडणुकांबद्दल चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच ते लालबागचा राजाचे दर्शनही घेणार आहेत.

अमित शाह हे आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबत अमित शाह हे जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. अमित शाह हे आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहे. यानंतर ते संध्याकाळी ७. ३० वाजता एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

यानंतर ९ सप्टेंबरला सोमवारी सकाळी १०.४५ वाजता अमित शाहा हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जाणार आहेत. यानंतर ११.१५ च्या सुमारास अमित शाहा हे एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जातील. त्यानंतर अमित शाह हे दुपारी १२.१० मिनिटांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. तसेच १२.५० मिनिटांनी अमित शाह हे आशिष शेलार यांच्या वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील, असे अमित शाह यांच्या दौऱ्याचे नियोजन आहे.

विधानसभेचा फॉर्म्युला निश्चित

दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. यातील 125 जागांचं मिशन भाजपने विधानसभेत ठेवलं आहे. यातील जवळपास 50 जागांवर निश्चित विजय होईल, असा विश्वास भाजपला आहे. तर उरलेल्या 75 जागांवर निवडून येण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

या उरलेल्या 75 जागांसाठी भाजपकडून वेगळी रणनिती ठरवण्यात आली आहे. या 75 जागा ज्या कोणत्या जिल्ह्यात असतील, त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यावर त्या मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार आहे. हा अहवाल राज्यातील भाजप वरिष्ठांना आणि केंद्रातील वरिष्ठांना दिला जाणार आहे. तसेच यात जे काही मतदारसंघ असतील, त्या मतदारसंघात तो नेता ग्राऊंड लेव्हला काम करणार आहे. सामान्य मतदारांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत एकत्र बांधणी करायची आहे.