मुंबई: सध्या शहरांच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेनेसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारनं कार्यवाही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. तसं पत्रच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवलं आहे. (Central Government’s proceedings to rename Mumbai Central as Nana Shankarsheth Terminus)
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलून नाना शंकरशेठ टर्मिनस करावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून पाठपुरावा सुरु आहे. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पत्र लिहिलं आहे. नामांतराबाबत सर्व यंत्रणांचा अहवाल प्राप्त झाला असून, केंद्र सरकार याबाबत कार्यवाही करत असल्याची माहिती त्यांनी सावंत यांना दिली आहे. यापूर्वी मुंबई सेंट्रलचं नाव नाना शंकरशेठ टर्मिनस करण्याबाबतचा ठरावर विधानसभेतही पारित झाला आहे.
जगन्नाथ शंकरशेठ हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, तसंच एक उद्योगपती होती. ते थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी आणि आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक होते. त्याचबरोबर पहिल्या रेल्वेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.
औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस नेत्यांना इशाराच दिला आहे. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नामांतरावर सहज बोलले असतील. मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारलं. तुम्ही असं कसं बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते असंच विरोध करतो म्हणाले. आता असंच बोलले म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची आशा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी नाव संभाजीनगर करा, असं सांगितलं”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले
संबंधित बातम्या:
नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात
अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु : संजय राऊत
Central Government’s proceedings to rename Mumbai Central as Nana Shankarsheth Terminus