मुंबई : राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय. पाहुयात राज्यभरात झालेल्या नुकसानाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय.
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 56 गावे बाधित झाली आहेत. गहू, कांदा, हरभरा, मका, ज्वारी, पपई, केळीच्या बागांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. शिंदखेडा तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिके मातीमोल झाली आहेत.
हरभरा, ज्वारी आणि मका या पिकांची लागवड झाली होती. पण पावसानं मोठं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक पिकांचं नुकसान झालंय. खामगाव, बुलढाणा ,चिखलीसह अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय. हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, मका वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडालीय. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात गारांसह पाऊस झालाय.
वाऱ्यासह पडलेल्या पावसाने आंबा फळांचं नुकसान झालंय.10 ते 15 मिनिटं कोसळलेल्या गारांनी आंब्याचं मोठं नुकसान झालंय. आंबे तुटून जमीनदोस्त झाले आहेत. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झालीय.
स्ट्रॉबेरी आणि ज्वारीचं पीक गारपीटीमुळं मातीमोल झालंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने शेतकरी धास्तावला आहे. ज्वारीला याचा सर्वाधिक फटका बसलाय. सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष काढण्याचा हंगाम सुरू झालाय. पण त्यातच अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय.
द्राक्ष खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं भाव पडले आहेत. अवकाळीचा फटका कोकणातल्या आंबा बागायतदारांना बसलाय. चिपळूण आणि गुहागरमधले आंबा बागायतदार संकटात आहेत. अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यात वादळी वारा आणि पावसामुळं काढणीला आलेला गहू झोपलाय.
मिरची व्यापाऱ्यांचं देखील मोठे नुकसान झालंय. विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागांनाही अवकाळी पावसानं झोडपलंय. गहू सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडालीय. बियाण्यांच्या दृष्टीने घेतलेल्या उन्हाळी सोयाबीनलाही फटका बसलाय..
सरकारनं अवकाळीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार हाच प्रश्न आहे.