मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत येणार आहेत. उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी चर्चा करण्यासाठी ते मुंबईत येत आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याचे बॅनर्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानाबाहेर लागले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्यानंतर आता उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येत असल्याने या दौऱ्याची चांगलीच चर्चा होत आहे.
मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान तसेच मलबार हिल परिसरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी योगी आदित्यनाथ हे आज दुपारी मुंबईत दाखल होणार आहेत.
मुंबईतील नामांकित आणि ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ हे आज सायंकाळी आणि गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.
उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न असणार आहे. उत्तर प्रदेशात चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशी ते बुधवारी सायंकाळी चर्चा करणार आहेत. गुजरातमध्ये उद्योग गेल्यानंतर योगाींचा हा मुंबई दौरा आता चर्चेचा विषय ठरला आहे.
येत्या 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान उत्तर प्रदेशात ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. या समिटमध्ये देशातील सर्व उद्योजकांना पाचारण करण्यात येणार आहे. त्याचा एक भाग योगी आदित्यनाथ मुंबईला येऊन उद्योजकांना या समिटमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देणार आहेत.
त्याशिवाय उत्तर प्रदेश सरकारमधील अनेक मंत्री अनेक देशात जाऊन तिथल्या उद्योजकांना या समिटमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देत आहेत. तसेच मल्टिनॅशनल कंपन्यांनाही हे आमंत्रण दिलं जात आहे. तसेच देशातील नऊ प्रमुख शहरात 5 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेश सरकारचे अनेक मंत्री जाणार असून ते उद्योजकांना आमंत्रण देणार आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून योगी आदित्यनाथ स्वत: मुंबईत येणार आहेत. त्यांच्यासोबत महसूल मंत्री रवींद्र जायसवाल आणि उद्योग मंत्री नंदगोपाल नंदी असणार आहेत.
आज दुपारी योगी आदित्यनाथ मुंभीत येतील. मुंबईत ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी कुलाबा येथील हॉटेल ताजमहलमध्ये उद्योगपतींशी चर्चा करतील. आजच ते बॉलिवूडमधील काही निर्माते आणि दिग्दर्शकांशीही चर्चा करतील.
त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. राज्यात भाजपचं वर्चस्व असल्याचं दाखवण्याचा यातून प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे.