औरंगाबादः महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकाची रिक्षा म्हणून विरोधकांकडून टीका केली जात होती. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीच्या युतीनंतर आता रिक्षाला आणखी एक चाक मिळाले असल्याचे सांगत या युतीचा गौरव केला होता.
तर आज ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती ही देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी आज व्यक्त केला आहे. त्यामुळे ही युती राज्यात वेगळा प्रयोग ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युतीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबादेमध्ये जोरदारपणे जल्लोष करण्यात आला आहे. त्यामुळे ही युती राजकारणासह सामाजिक चळवळीत वेगळा ठसा उमटविणार असल्याचा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
ही युती झाली असल्यामुळेच आणि वंचित आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची युती ही देशात नव्या परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. या युतीमुळेच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे.
सध्या देशात सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे. त्याला नवी दिशा देण्याासठी या युतीच्या माध्यमातून बळ मिळणार आहे. ही युती राजकीय नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडवणार आहे.त्यामुळेच विरोधकांकडून यावर टीका केली जात असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
तर शिंदे गट आणि शिवसेनेचा सुरु असलेल्या वादावर मत व्यक्त करताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, ज्यांच्या गळ्यात अपात्रतेची टांगती तलवार लटकलेली आहे तिच लोकं सुप्रीम कोर्टात गेली आहेत असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.