मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना माहीमच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Ranjit Savarkar Hospitalised). रणजीत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रणजीत हे शुक्रवारी (3 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भेटायला गेले होते, मात्र, उद्धव ठाकरे यांनी रणजीत सावरकर यांना वेळ दिली नाही. त्यानंतर रणजीत हे त्यांना कार्यालयात परतले, तिथे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या रणजीत सावरकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेस सेवादलामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत एक आक्षेपार्ह पुस्तक छापण्यात आलं. यावरुन सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे संतापले. या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी घेऊन रणजीत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते. सावरकरांना आपला आदर्श मानणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपलं म्हणणं नक्की ऐकून घेतील, अशी अपेक्षा रणजीत यांना होती. मात्र, असं झालं नाही. जेव्हा रणजीत सावरकर हे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि निघून गेले. वीर सावरकरांच्या नावावर मुख्यमंत्री आपल्याला थोडा वेळ देतील, आपलं ऐकतील, असं रणजीत यांना वाटलं होतं. मात्र, त्यांचा अपेक्षा भंग झाला.
R Savarkar: I came to meet CM; I had sent several requests for appointment but I could not meet him today. He didn’t have a minute to talk to me even when it’s about Savarkar ji’s respect. I am highly disappointed. It is an insult to Savarkar ji. #Maharashtra https://t.co/DwjzUJYS3j
— ANI (@ANI) January 3, 2020
याबाबत रणजीत सावरकरांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिलं आहे. यामध्ये काँग्रेस सेवा दलसी संबंधित लोकं आणि काँग्रेस पक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
काँग्रेस सेवा दलच्या वादग्रस्त पुस्तकावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
“वीर सावरकर आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही”, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच, “भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे त्यावर बंदी आहे. अशी पुस्तके तरीही वाटली जातात, भाजपच्या नेत्यांविषयीही वाटली गेली आहे. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील”, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
“सावरकरांवर आक्षेप घेणारे जे लोक आहेत त्यांचं डोकं तपासले पाहिजे. सतत वीर सावरकार यांच्याबद्दल आरोप करणे ही त्यांच्या मेंदूतील घाण आहे मग ते कोणीही असोत. वीर सावरकर हे आमच्यासाठी महान होते आणि राहतील”, असं राऊत यांनी सांगितलं.
वादग्रस्त पुस्तक
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस सेवादलाने विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात अनेक वादग्रस्त टिपण्या आहेत. सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांबाबतचा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात केला आहे.