कांदिवली पश्चिमेत भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत दमबाजी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरुन आता राजकारण पेटले आहे. योगेश सागर यांनी पालीका अधिकाऱ्याची फाईल थेट गटारात टाकल्याचे व्हिडीओत दिसत आहे. अशा प्रकारे अधिकाऱ्यांना दमबाजी आणि शिवीगाळ करणे योग्य नाही, उत्तर मुंबईत खासदार यांचा, आमदार यांचा आणि नगरसेवकही यांचे तरीही यांची कामे होत नाहीत, पालिका अधिकारी यांचे ऐकत नाहीत तर हे मुख्यमंत्र्यांचे अपयश असल्याचीही खोचक टीका शिवसेना उध्दव गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी केली आहे.
भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत योगेश सागर यांनी अधिकाऱ्यांची फाईल नाल्यात टाकल्याचे दिसत आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी टीका केली आहे. आम्ही हा व्हिडीओ पाहीला तो अतिशय आक्षेपार्ह असून पालिका अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणारा असल्याचे घोसाळकर यांनी म्हटले आहे. उत्तर मुंबईमध्ये खासदार बीजेपीचे, आमदार बीजेपीचे, नगरसेवक बीजेपीचे तरी तुमचे काम होत नाही, म्हणून तुम्हाला शासन चालवायला येत नाही हे स्पष्ट होतंय असेही घोसाळकर यांनी म्हटले आहे.
योगेश सागर आमचे मित्र आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहिला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या हातातील फाईल घेऊन गटारात टाकली. त्यांचा राग मी समजू शकतो. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर हात उगारले. त्यानीअतिशय आवडते शब्द वापरून अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. मला वाटतं हा व्हिडिओ आशिष शेलाराना दाखवले तर फार चांगले होईल आणि शेलार यांनी यावर उत्तर देण्याची गरज आहे. नालेसफाईचे सगळे कंत्राट ज्यांनी केली त्या चहल यांना निलंबित केले पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा राग बिचाऱ्या अधिकाऱ्यांवर व्यक्त करण्यापेक्षा आपण सत्तेत आहात. आपले सर्वोच्च नेते देवेंद्रजी त्यांच्याकडे हा राग व्यक्त करून आणि आमच्या सीएमला ही लूट थांबवायला सांगितली तर बरे होईल. या गोष्टीचा आपण निषेध करतो असेही घोसाळकर यांन म्हटले आहे.
आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे. त्यामुळे आता ते जागृत झालेले आहेत. आणि एवढे दिवस काम प्रलंबित राहिली होती. त्यांना आता आठवण आली. या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचे भाषा वापरली जात आहे, त्याच्यामध्ये माज दिसतोय. पोलीस प्रशासन काय करते आहे. आमदार झाला म्हणजे या देशाच्या ठेकेदार झालेला नाहीये. तुम्हाला नीट काम करता येत नाही. हा जे काही हिरोगिरी दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थाने त्यांचे पाप झाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे थेट योगेश सागर यांच्या वर कारवाई झाली पाहिजे. आणि हे डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजिनची सरकार आहे. आणि ट्रिपल इंजिनची सरकार गटात पडलेले आहे हे दिसतेय. योगेश सागर आणि त्यांचे जे सगळे आजूबाजूचे अंटर पंटर आहेत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
भाजपा आमदाराने स्वत: केली पोस्ट –
BMC, कंत्राटदार आणि मुंबईतील गटारं फक्त पैसा आणि पाणी साठवण्याचे काम करत आहेत.@Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/vj7J66z3m3
— Yogesh Sagar (Modi Ka Parivar) (@Yogeshsagar09) May 30, 2024
वर्षभरापूर्वी मी ज्या कामाचे भूमिपूजन केले होते ते अद्याप पूर्ण झालेले नाही. एकाच वेळी सर्वत्र रस्त्याचे काम सुरू झाले असून ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. गटार उघडे राहून त्यात कोणी पडल्यास जबाबदार कोण? आणि अशा अधिकारी आणि BMC कंत्राटदारांचे काय करायचे? कंत्राटदार आमचे ऐकत नाहीत असे बीएमसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बीएमसी अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याने ते ऐकत नाहीत, आता अशा अधिकारी आणि ठेकेदारांनी ज्या भाषेत बोलावे त्या भाषेत मी बोललो आहे. त्यांना समजावे तसे समजावून सांगितले आहे. मी कोणाला थप्पड मारली नाही, कोणाला शिवीगाळ केली नाही असे योगेश सागर यांनी यावर म्हटले आहे.
आमदार योगेश सागर यांच्यानंतर आता भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी देखील बीएमसी अधिकाऱ्यांना दम दिला आहे. गोकुळधाम गोरेगांव येथील साई मार्गावर गेले काही दिवस सीवरेजचे काम चालू आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावर खोदकाम आणि गटार नव्याने बांधण्याचे काम चालू आहे. हे काम कासवाच्या गतीने सुरु आहे, तसेच रस्त्याची देखील दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वाहने चालविणे सोडाच, परंतू पायी चालताना देखील खूप त्रास आणि अडथळा होत आहे. नगरसेविका प्रीती सातम यांनी या कामांची पाहणी केली आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला सज्जड दम दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी 5 जून 2024 पर्यंत रस्ता व्यवस्थित करतो असे आश्वासन दिले आहे. परंतू दिलेल्या तारखेपर्यंत साई मार्ग व्यवस्थित नाही झाला तर अधिकाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा देखील भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी दिला आहे.