मुंबई : पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपनं मिशन 400 ची घोषणाही केली.पण संजय राऊतांनी परिर्वतनाचा दावा केलाय. 5 राज्यात भाजपला जबर धक्का बसणार असून इथूनच मोदींना रोखण्यास सुरुवात होणार असल्याचं राऊत म्हणालेत.
2024 मध्ये देशात परिवर्तन होणार…आणि 5 राज्य देशाच्या भविष्याचा निकाल लावणार असा दावा संजय राऊतांचा आहे. संजय राऊतांना ज्या 5 राज्यातून कमाल होईल असं वाटतंय ती राज्यं आहेत. महाराष्ट्र….बिहार….कर्नाटक…पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यात लोकसभेच्या एकूण 183 जागा आहेत. 2014 मध्ये पंतप्रधान मोदींना भाजपनं प्रोजेक्ट केलं. देशात मोदी लाट सुरु झाली.
2014 मध्ये 282 जागा जिंकत भाजपनं पूर्ण बहुमत मिळवलं पण 2014 पेक्षाही मोठा विजय 2019 मध्ये भाजपनं मिळवला. 2019 मध्ये भाजपचे 303 खासदार निवडून आले. आता 2024 साठी भाजपनं मिशन 400+ घोषित केलंय.
2024मध्ये पुन्हा भाजपचं सरकार आलं तर मोदी पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक करणार पण आता ज्या 5 राज्यांचा उल्लेख संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती होती. त्यावेळी भाजपला 23 जागा तर शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. पण भाजपशी ठाकरेंनी काडीमोड केलाय त्यामुळं युती नाही. इथं 3 पक्षांची महाविकास आघाडी भाजपला रोखणार असं राऊतांना वाटतंय
बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. 2019 मध्ये भाजप आणि जेडीयूची युती होती. त्यामुळं भाजपला मोठं यश मिळालं. भाजपचे 17 आणि जेडीयूला 16 खासदार निवडून आले होते. पण आता नितीश कुमारांच्या जेडीयूशी भाजपची युती तुटलीय आणि बिहारमध्ये लालूंच्या आरजेडीसोबत नितीश कुमारांचं सरकार आहे.
कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपनं कमाल करत 25 खासदार निवडून आणले होते. पण आता काँग्रेस इथं टक्कर देतेय. 2018 मध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार आलं होतं. मात्र भाजपच्या ऑपरेशन कमळमुळं कुमारस्वामींचं सरकार कोसळलं. आता कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वेमध्ये काँग्रेसला पसंती देण्यात आलीय.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. इथं भाजपनं पहिल्यांदाच मोठी मुसंडी मारत 18 खासदार आणले होते..पण यावेळी मोदींना रोखण्याचा इशारा ममता बॅनर्जींनी केलाय. 2021मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 292 पैकी 213 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला.
आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. 2019 मध्ये मोदींची देशभरात लाट असताना एकही जागा जिंकता आली नाही. तर YSR काँग्रेसच्या जगन मोहन रेड्डींनी 22 खासदार निवडून आणले. सध्या आंध्रात सरकारही YSR काँग्रेसचंच असून 2024मध्ये मोदींसमोर आंध्र प्रदेश चॅलेंजच आहे.
देशात मोदींचा विजयी रथ रोखायचा असेल तर विरोधकांची एकजूट आवश्यक आहे..पण तूर्तास तसं दिसत नाही. पण राज्याराज्यांमधून भाजपला घेरण्याची तयारी तितकी दिसतेय. त्यात किती यश येणार हे 2024मध्येच स्पष्ट होईल.