मुंबई : ठाण्यात एका फेसबुक पोस्टवरुन मारहाण झाली. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप, ठाकरे गटानं केला. त्यानंतर उद्धव ठाकरे थेट ठाण्यात आलेत. ठाण्यात नेमकं काय घडलंय? पाहा टीव्ही9चा मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
ठाण्यात फेसबुक पोस्टवरुन झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचलाय. मारहाण झालेली महिला ही ठाकरे गटाची असून, शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप आहे. संध्याकाळी ऑफिसच्या आवारात, मारहाण केली असून पोटावर लाथ मारली असा आरोप ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांनी केलाय. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. मात्र हा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं फेटाळलाय.
आता मारहाणीचं प्रकरण ज्या पोस्टवरुन सुरु झालं. ती रोशनी शिंदेंची फेसबुक पोस्ट काय होती, तेही पाहुयात. काल ठाण्यात रॅली कव्हर करणाऱ्या पत्रकाराला एका प्रवक्त्याने धमकी दिली आणि दुसऱ्याने बाहेर न निघण्यास सांगितलं.
दिघे साहेब असते तर त्यांनी काय केलं असतं. ते सर्वांना माहिती आहे. नुसतं आनंद मठ नावावर करुन काही होत नसतं. मात्र आपण या पोस्टवरुन सॉरीचाही मेसेज पाठवला. तरीही शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप रोशनी शिंदेंचा आहे. तर समज देण्य़ासाठी गेले असताना रोशनी शिंदेंनीच शिवीगाळ केली. त्यामुळं मारहाण नाही तर समजवण्याचा प्रयत्न केला असं शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंनी म्हटलंय.
मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बातमी, वाऱ्यासारखी पसरली. मातोश्रीहून स्वत: उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये रोशनी शिंदेंची विचारपूस केली. ठाण्यात महिलांची गँग तयार झालीय का?, असा सवाल करतानाच ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिलाय.