मुंबई : मुंबईतली फाईव्ह स्टार हॉटेलं ही नेत्यांनी गजबजून गेली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना अलिशान आसा हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. दुसरीकडे काही अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्या मागची धावपळ (Vidhan Parishad Election) सुरूच आहे. असाच धावपळीत आज हॉटेल ट्रायडंटच्या बाहेर दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी पक्षातील दोन उमेदवार ट्रायडंटच्या बाहेर भेटले. या भेटीची आणि या फोटोची सध्या खास चर्चा आहे. भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) हे विधान परिषदेसाठी उमेदवार आहेत. तर दुसरीकेड राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांना संधी देण्यात आलीय. नेमकी याच दोन नेत्यांची आज हॉटेल ट्रायडंटच्या बाहेर भेट घडून आली आहे. निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना या दोन्ही नेत्यांमध्ये काय बरं चर्चा झाली असेल? असा सवाल आता प्रत्येकाच्या मनात आहे. या चर्चेतला मजूकर मात्र गुलदस्त्यातच आहे. पण फोटो लक्ष वेधून घेणार ठरलाय.
राष्ट्रवादीने आपले आमदार हे हॉटेल ट्रयडंटमध्ये ठेवले आहेत. तर भाजपने आपले आमदार हॉटेल ताजमध्ये ठेवले आहेत. मात्र खडसे राष्ट्रवादीची बैठक संपवून हॉटेलमधून बाहेर येत असतानाच राम शिंदे हॉटेलमध्ये येत होते. एकनाथ खडसे आणि राम शिंदे हे आधी दोघेही भाजपमध्येच होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच खडसेंनी भाजपची साथ सोडली आणि दोघं वेगवेगळ्या पक्षातून प्रतिस्पर्धी झाले. तरी यांच्यातला जिव्हाळा अजूनही तसाच आहे.
दुसरीकडे आज सर्व राजकीय पक्षांच्या बैठका पार पडल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या महावकास आघाडीची बैठक होणार आहे. शरद पवार दिल्लीला जाणार असल्याने या बैठकीला गैरहजर राहणार आहेत. मात्र तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी दिली आहे.
उद्या शिवसेनाचा वर्धापन दिनही आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा राज्याच्या राजकारणातला महत्वाचा दिवस असणार आहे. आधी ऑनलाईन प्लॅन झालेला शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या हॉटेल वेस्टीनमध्येच साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेस्टीनमध्ये दाखल होत महाराष्ट्राला आणि आमदारांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे उद्याचा दिवसही महाविकास आघाडी आणि भाजपच्या मतांचा जुळवाजुळवीचा आणि बैठकांचा ठरणार आहे.